ठाणे

भिवंडी महापालिकेच्या इमारतीमध्ये पार्किंगसाठी जागा नाही! मालमत्ता विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांची अडचण

Swapnil S

भिवंडी : शहरातील काप आळीमधील भिवंडी महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये प्रभाग समिती १ व २ या दोन कार्यालयांसह मनपाची इतर प्रशासकीय कार्यालये आहेत; मात्र या इमारतीच्या आवारात निजामपूर पोलीस ठाण्याचा मुद्देमाल असल्याने कार्यालयात वाहने पार्किंगसाठी जागा अपुरी झाली आहे. या आवाराच्या बाहेर नागरिकांनी दुचाकी लावल्याने टोईंगवाल्यांना नाहक भुर्दंड भरावा लागत आहे.

शहरातील कोटरगेट मस्जिदसमोर निजामपूर आणि शहर पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू असल्याने तसेच शिवाजीनगर येथे असलेल्या निजामपूर पोलीस ठाण्यात नेहमी पावसाचे पाणी साचत असल्याने महानगरपालिकेने आपल्या जुन्या इमारतीमधील तळमजल्यावर निजामपूर पोलीस ठाणे सुरू करण्यास तात्पुरता परवानगी दिली. येथे पोलिसांचे कामकाज सुरू असताना विविध गुन्ह्यांतर्गत जमा केलेला मुद्देमाल पोलिसांनी याच इमारतीच्या आवारात ठेवला. मागील वर्षी निजामपूर पोलीस ठाणे नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाले; मात्र तेथे जागा उपलब्ध नसल्याने निजामपूर पोलिसांचा मुद्देमाल पालिकेच्या आवारात राहिला आहे. याबाबत महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांची अडचण झाली आहे.

मनपाच्या कार्यालयात कामकाजासाठी आलेल्या नागरिकांनी आपली वाहने मनपाच्या आवाराबाहेर लावल्यास शहरातील टोईंगवाले ती वाहने उचलून घेऊन जातात. त्यामुळे नागरिकांना नाहक दंड भरावा लागत आहे. हा दंड भरावा लागू नये म्हणून काही नागरिक मनपाच्या जुन्या इमारतीच्या आवारात अस्ताव्यस्त स्थितीत वाहने लावतात. नागरिकांची अडचण होऊ नये व इमारतीच्या आवारात पार्किंगसाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने या इमारतीच्या आवारात असलेली निजामपूर पोलीस ठाण्याची मालमत्ता काढण्याची तजवीज करावी. अन्यथा ही मालमत्ता ठेवण्यासाठी इतरत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सध्या निजामपूर पोलीस ठाण्याच्या आवारात हा मुद्देमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. हा मुद्देमाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गंगा-जमुना इमारतीच्या जागेत अथवा कारिवली गावातील पोलिसांच्या जागेत ठेवण्याची कारवाई सुरू आहे.

-संतोष आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निजामपूर पोलीस ठाणे

भिवंडी पालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये निजामपूर पोलीस ठाण्यासाठी तात्पुरती जागा दिली होती. ते पोलीस ठाणे स्थलांतर झाल्यानंतर पालिकेच्या आवारात ठेवलेल्या विविध मुद्देमालाची त्यांना माहिती दिली होती. परंतु पालिकेच्या आवारातील वाहनांचा मुद्देमाल त्यांनी अद्याप हलविलेला नाही. त्याबाबत त्यांना लवकरच कळविण्यात येणार आहे.

-सुरेंद्र जाधव, मालमत्ता विभाग, भिवंडी महानगरपालिका

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस