ठाणे

Badlapur : शिवरायांच्या पुतळ्याचे कंत्राट वादाच्या भोवऱ्यात? अनुभवशून्य कंत्राटदाराला काम दिल्याच्या निषेधार्थ शिल्पकाराचे उपोषण

निविदा प्रणालीचा भंग करत न्यूनतम दर तसेच कामाचा अनुभव डावलून काम दिल्याचाही आरोप या शिल्पकाराने केला आहे

Swapnil S

बदलापूर : मालवण येथील पुतळा प्रकरण ताजे असतानाच बदलापुरात अनुभव नसलेल्या कंपनीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्याचे कंत्राट दिल्याचा आरोप करत एका शिल्पकाराने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. निविदा प्रणालीचा भंग करत न्यूनतम दर तसेच कामाचा अनुभव डावलून काम दिल्याचाही आरोप या शिल्पकाराने केला आहे, तर संकल्पना आणि सादरीकरणावरून हे काम देण्यात आल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीजवळ शिल्पकार राजेंद्र आल्हाट यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्यावतीने उल्हासनदीलगत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत राजेंद्र आल्हाट यांच्या राज एंटरप्रायजेससह चार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. निविदा भरलेल्या कंपन्यांना २९ ऑगस्ट रोजी नगर परिषद प्रशासनाने सादरीकरणासाठी पाचारण केले होते. सादरीकरण आणि निविदाकारांच्या चर्चेवेळी असे दिसून आले की एका निविदाकार कंपनीने एकही पुतळा बसविलेला नव्हता. दुसऱ्या निविदाकार कंपनीने दोन ते तीन पुतळे बसविलेले आहेत. तिसऱ्या निविदाकाराने पुतळयाची कामेच केलेली नाहीत, असे शिल्पकार राजेंद्र आल्हाट यांनी सांगितले.

सकल मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा

बदलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत सकल मराठा समाजाच्या वतीने नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दरवाजाला खेळण्यातील नोटांचा हार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही सकल मराठा समाजाचे अविनाश देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

सादरीकरणावरून निर्णय -पालिका

निविदा प्रक्रियेत प्राप्त होणाऱ्या संकल्पनेतून सर्वोत्तम संकल्पना स्वीकृत करायची असल्याने सादरीकरणाअंती प्राप्त संकल्पनांमधून उत्कृष्ठ संकल्पना आढळून आलेल्या निविदाकाराची निविदा स्वीकृत करण्यास पुतळा समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार विहित प्रक्रिया अवलंबून कार्यादेश देण्यात आल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी