बदलापूर : पौरोहित्याला उद्योगाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबाबत आवश्यक अभ्यास करून संबंधित अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करावा, अशा सूचना परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी दिल्या.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक कॅप्टन आशिष दामले यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झाली. या बैठकीत पौरोहित्याला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला.तसेच राज्यातील प्रत्येक नियोजन भवनात महामंडळाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतही १५ दिवसांत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेला ‘स्व. अजितदादा पवार कर्ज योजना’ असे नाव देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.
वैयक्तिक कर्ज योजनेंतर्गत व्याज परतावा योजना राबविणे, विभागीय कार्यालयाच्या पुनर्बांधणीसाठी पाठपुरावा करणे, योजनांमधील लाभार्थ्यांची वयोमर्यादा १८ ते ४५ वरून १८ ते ५५ वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव, तसेच कंपनी सचिव आणि लेखापरीक्षकांची नियुक्ती यावर बैठकीत चर्चा झाली. महामंडळाच्या विविध योजना आणि आगामी उपक्रमांचा आढावाही घेण्यात आला.