भिवंडी महापालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही बंद; सुरक्षा वाऱ्यावर, जुनी यंत्रणा धूळखात 
ठाणे

भिवंडी महापालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही बंद; सुरक्षा वाऱ्यावर, जुनी यंत्रणा धूळखात

भिवंडी शहराचा कारभार चालविणाऱ्या महापालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रतिनिधी

सुमित घरत /भिवंडी

भिवंडी शहराचा कारभार चालविणाऱ्या महापालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका मुख्यालयाच्या इमारतीत २०१२ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या यंत्रणेची योग्य देखभाल व वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने अनेक कॅमेरे हळूहळू निकामी झाले आहेत.

सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचा ठेकाही सुमारे सहा महिन्यांपूर्वी संपला आहे. त्यातच जुने झालेले कॅमेरेही स्पष्ट चित्रीकरण देत नसल्याने संपूर्ण यंत्रणा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयाच्या परिसरात घडणाऱ्या दुर्घटना, वाद किंवा अन्य घटनांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसल्याने तपासासाठी आवश्यक पुरावे मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. महापालिका मुख्यालयात अनेकदा राजकीय वाद निर्माण होतात. काही वेळा वादाचे रूपांतर भांडण अथवा हाणामारीतही होते. अशा घटनांचे चित्रीकरण उपलब्ध नसल्याने नेमकी घटना काय घडली, याचा वस्तुनिष्ठ पुरावा मिळणे कठीण होते.

सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेच्या विद्युत विभागाकडे असतानाही या यंत्रणेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. सध्या काही कॅमेरे सुरू असले तरी त्यांचे चित्रीकरण डीव्हीआरमध्ये सुरक्षितपणे साठवले जाते की नाही, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. महापालिका मुख्यालयात एकूण किती सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत आणि त्यापैकी किती कॅमेरे सध्या कार्यरत आहेत, याबाबत माहिती घेण्यासाठी विद्युत विभागाचे उपअभियंता वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडेही याबाबतची माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले.

नवे कॅमेरे लावण्यासाठी प्रक्रिया सुरू

महापालिका मुख्यालयात २०१२ मध्ये बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा जुनी झाली असून अनेक कॅमेऱ्यांची चित्रणक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयात आधुनिक तंत्रज्ञानावरील नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे यांनी दिली.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

महागाई आणखी वाढणार; चालू आर्थिक वर्षात दर ५.२ टक्क्यांवर जाणार

पुणे-नांदेडमधील 'महाज्योती' व 'वनार्टी'ची परीक्षा ऐनवेळी रद्द; केंद्रावर तांत्रिक गोंधळ, विद्यार्थ्यांचा संताप

...तर ती 'आयात' नाही; रशियन नागरिकाला Thar परत करण्याचे कोर्टाचे आदेश

फडणवीसांच्या भेटीची कंत्राटदारांची मागणी; ८६ हजार कोटींची बिले थकीत