ठाणे

धुळीच्या प्रदूषणाने उल्हासनगरकर त्रस्त

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तथा मलवाहिनी टाकण्याचे काम शहरात सुरू आहे. त्यामुळे शहरात सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत. या रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, हवेत उडणाऱ्या मातीच्या धुळीमुळे रहिवासी मात्र त्रस्त झाले आहेत. अशी ही विकासकामे लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करून मतदारांना सुखावण्यासाठी पालिकेने आचारसंहिता काळात बैठका घेत विकासकामे पूर्ण करण्याचा केविलवाण प्रयत्न सुरू केला आहे.

उल्हासनगर शहरात सात प्रमुख रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम मागील चार महिन्यांपासून सुरू आहे. या सात रस्त्यांपैकी पाच रस्ते हे रिंग रोड रस्ते आहेत, तर दोन रस्ते हे अंतर्गत रस्ते आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यांचे काम मंद गतीने सुरू असल्याने रस्त्यांवर धूळच धूळ आहे. या व्यतिरिक्त अमृत योजनेअंतर्गत शहरात ४१६ कोटीचा निविदेअंतर्गत मलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे, या मलवाहिन्या टाकल्यानंतर रस्त्याचे तत्काळ काँक्रीटीकरण तथा डांबरीकरण केले जात नसल्याने तिथेही रस्त्यावर धुळीचा धुराळा उडताना दिसत आहे. या धुळीचा परिणाम रस्त्याच्या दुतर्फा राहणारे तथा दुकानदार तसेच रस्त्यावरून रहदारी करणाऱ्यांना होत आहे. त्यामुळे याचा फटका येत्या लोकसभा निवडणुकीत बसू शकतो, मतदानाचे प्रमाण कमी होऊ शकते.

ही बाब जाणून रस्त्यांच्या विकासकामाबाबत उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजिज शेख यांचे अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहामध्ये आढावा बैठकी आयोजित करण्यात येत आहेत. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अर्जुन कोरगांवकर, अधीक्षक अभियंता धाबे, सहा. संचालक नगर रचना ललित खोब्रागडे, शहर अभियंता संदीप जाधव, कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, हनुमान खरात, तसेच संबधित कामांचे कंत्राटदार व सल्लागार उपस्थित होते.

कामांची गती वाढण्यासाठी दर आठवड्याला बैठका

विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी धूळ उडून प्रदूषण होणार नाही. यासाठी पाणी फवारणी करण्यात यावी व ज्या रस्त्यांचे मलवाहिनी टाकून काम पूर्ण झाले आहे, त्या रस्त्यावर तत्काळ पाणी मारून, दबाई करून रस्त्याचे प्रकारानुसार डांबरीकरण किंवा कॉंक्रीटीकरणाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांनी या बैठकीत दिले. कामांची गती वाढावी यासाठी दर आठवड्याला अशी बैठक आयोजित करण्यात येणार असून, याबाबतीत नागरिकांच्या तक्रारींची दखल त्वरित घेऊन उपाययोजना करून काम वेत वेळेत पूर्ण करावे अशी आयुक्तांनी सूचना दिली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस