काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन; राम मंदिरातील गैरव्यवहारावर भाजपचे मौन का? 
ठाणे

काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन; राम मंदिरातील गैरव्यवहारावर भाजपचे मौन का?

अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावर सातत्याने राजकीय भूमिका घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता तेथील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरून काँग्रेसने लक्ष्य केले आहे.

Swapnil S

ठाणे : अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावर सातत्याने राजकीय भूमिका घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता तेथील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरून काँग्रेसने लक्ष्य केले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी, रामाच्या नावावर सातत्याने राजकारण करणारेच आता या कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवर मौन का बाळगत आहेत? असा थेट सवाल उपस्थित केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी ठाण्यात राज्यव्यापी ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले.

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते ऐतिहासिक कौपिनेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिरात एकत्र आले. यावेळी अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

पांढऱ्या टोप्या परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी ‘रघुपती राघव राजाराम’, ‘खरा तो एकचि धर्म’ आणि ‘पसायदान’ यांचे सामूहिक गायन करत शांततापूर्ण पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान ‘भक्तांच्या श्रद्धेवर केला हल्ला, रामाच्या दानपेटीवर मारला डल्ला’ तसेच ‘राम नाम जपना, पराया माल अपना’ अशा आशयाचे फलक झळकावत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या शांततापूर्ण आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी गजानन देसाई, मधू मोहिते, विश्वास उटगी, राजेश जाधव, शीतल आहेर, मिलिंद खराडे, सेवादलाचे अध्यक्ष रवी कोणी, उमेश कांबळे तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी डॉ. संजय मंगो, वंदना शिंदे, जगदीश खैरालिया, आनंद सांगळे, राजू शेट्टी, संगीता कोटल, शांती इलावडेकर, हर्षद ठाकूर, अजिंक्य भोईर यांच्यासह ठाण्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

अहिंसक सत्याग्रह

भिवंडी : अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील कथित कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या निषेधार्थ भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी अहिंसेच्या मार्गाने ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून शहर जिल्हाध्यक्ष आबिद खान यांच्या नेतृत्वाखाली मुरलीधर कंपाऊंड येथील शिवमंदिराबाहेर कार्यकर्त्यांनी ‘रघुपती राघव राजाराम’ तसेच ‘खरा तो एकची धर्मा’ ही भक्तिगीते गात शांततापूर्ण आंदोलन करून निषेध नोंदविला.

या आंदोलनात माजी खासदार सुरेश टावरे, नगरसेवक प्रशांत लाड, काँग्रेसचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान उपस्थितांनी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच धार्मिक स्थळांवरील भाविकांच्या देणगीबाबत पारदर्शकता राखली जावी आणि अशा प्रकारच्या कथित गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी भूमिकाही व्यक्त करण्यात आली.

यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने स्थानिक पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करून अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

राम आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या कथित प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. संपूर्ण कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
राहुल पिंगळे, अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

Mumbai 7/11 Blasts : ११ मिनिटांत सात स्फोटांनी हादरली होती मुंबई; हल्ल्याला २० वर्षे, मृतांना पश्चिम रेल्वेकडून श्रद्धांजली

दुधाची तहान ‘पिशवी’वर; सुट्या पिशवीतून दूधविक्रीला FDA ची बंदी, ...अन्यथा होणार ३ लाखांचा दंड

शिक्षक बदलीसाठी नियमावली तयार करणार; मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

राज्य सरकारचे अर्थसंकल्पबाह्य कर्ज २८,३२५ कोटी रुपयांवर; राज्य वित्त लेखा परीक्षण अहवालात ठपका

Mumbai : जीर्ण इमारतीला स्वतंत्रपणे पुनर्विकासाचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय