जव्हार शहर हे समुद्र सपाटीपासून एक हजार आठशे फूट उंचीवर आहे, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते. मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे, मात्र सोमवारी तर पावसाने कहर केला असून, धोधो पडणाऱ्या पावसाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. १४६ मी. मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, ती पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. यामुळे खेडोपाड्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. सात घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले असून मुख्य वीज वहिनी तुटून नुकसान झाले आहे.
जव्हार तालुक्यात आपटाळे, खडकीपाडा, धरमपूर, भुरीटेक, साखरशेत, माळघर व चंद्रगांव अशा सात गाव पाड्यात घरांची पडझड झाल्याची महसूल विभागात नोंद करण्यात आली आहे. जव्हारमध्ये चोवीस तासात हजारो मिलिमीटर पाऊस जरी पडला तरी, पाणी पूर्णपणे वाहून जात असे, मात्र यंदा नगर परिषदेने गटारे नाले साफ सफाई केली नसल्यामुळे पाणी साचून मुख्य रस्त्यांना तळ्याचे रूप आले आहे.
शहरातील बहुतांश गटारे नव्याने तयार करण्यात आली आहेत, मात्र गटारा पुढील मार्ग मोकळा न केल्यामुळे गटाराचे पाणी पूर्ण रस्त्यावरून वाहत आहे. तसेच मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे, मात्र रस्ता तयार करतांना रस्त्याला उतार न दिल्यामुळे नवीन रस्त्यावर सुद्धा तळे साचलेले दिसत आहेत. कामे सुरू असतांना अभियंत्यांनी रस्ते कसे तपासले असतील? असा प्रश्न निर्माण होत आहे.