डोंबिवली : कल्याणनंतर आता डोंबिवलीतील एका ६७ वर्षीय व्यक्तीचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती केडीएमसी आरोग्य विभागाच्या मुख्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी दिली.
केडीएमसी क्षेत्रातील दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि सध्या तीन कोविड रुग्ण आहे. त्यापैकी दोन रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर एक रुग्ण घरीच आयसोलेशनमध्ये आहे, अशी माहिती डॉ. दीपा शुक्ला यांनी दिली.
दोनच दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील एका ४७ वर्षीय महिलेचा कोविडमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ आता डोंबिवलीमधील एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. विशेष म्हणजे कोविडमुळे मृत्यू झालेल्या या दोन्ही व्यक्तींना पूर्वीचे गंभीर आजार असल्याची माहितीही केडीएमसी आरोग्य विभागाने दिली आहे. या वृद्ध व्यक्तीला हायपरटेन्शन आणि मधुमेह या सहव्याधी होती. तसेच १२ वर्षांपूर्वी आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे या व्यक्तीला पॅरालिसिस झाला होता. या व्यक्तीने कोविड लस घेतलेली नव्हती, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी दिली.