Dombivli Crime : ७ वर्षांचं प्रेम संपलं अन् तरुणाचा संताप अनावर; पेट्रोल टाकून माजी प्रेयसीचं घर पेटवण्याचा प्रयत्न 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

Dombivli Crime : ७ वर्षांचं प्रेम संपलं अन् तरुणाचा संताप अनावर; पेट्रोल टाकून माजी प्रेयसीचं घर पेटवण्याचा प्रयत्न

डोंबिवलीत ७ वर्षांचं प्रेमसंबंध संपल्यानंतर संतापलेल्या तरुणाने माजी प्रेयसीच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा आरोप आहे. कुटुंब सुखरूप बचावलं असून, आरोपीला अटक झाली आहे.

Mayuri Gawade

डोंबिवली : प्रेमसंबंधात दुरावा निर्माण झाला म्हणून एखादी व्यक्ती किती टोकाचं पाऊल उचलू शकते, याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे. तब्बल सात ते आठ वर्षं एकत्र राहिल्यानंतर तरुणीने नातं संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय तिच्या प्रियकराला सहन झाला नाही. ब्रेकअपच्या रागातून त्याने थेट तरुणीच्या घरालाच लक्ष्य केलं. घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून त्याला आग लावल्याचा आरोप तरुणावर आहे. सुदैवाने वेळीच आग विझवल्याने तरुणीसह तिचे आई-वडील थोडक्यात बचावले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सात-आठ वर्षांचं नातं संपवलं, प्रियकर संतापला

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, डोंबिवलीतील एका उच्चभ्रू परिसरात ही तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. तिचे दीपेश रस्तोगी नावाच्या तरुणासोबत गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही काळापासून दोघांमध्ये मतभेद वाढू लागले होते. त्यामुळे तरुणीने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला. तिने याबाबत दीपेशला स्पष्टपणे सांगितलं होतं.

मात्र, इतक्या वर्षांचं नातं संपवण्याचा तरुणीचा निर्णय दीपेशला स्वीकारता आला नाही. ब्रेकअपमुळे तो संतापला होता. याच रागातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे.

घराच्या दरवाजावर पेट्रोल ओतलं अन् आग लावली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १९) दीपेशने तरुणी राहत असलेल्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतलं आणि आग लावल्याचा आरोप आहे. अचानक दरवाजाला आग लागल्याने घरातील तरुणीसह तिच्या आई-वडिलांची एकच धावपळ उडाली.

मात्र, कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखत तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आग घराच्या आतील भागात पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आली. सुदैवाने या घटनेत तरुणी किंवा तिच्या आई-वडिलांना कोणतीही दुखापत झाली नाही.

तरुणीसह तिच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न?

या घटनेनंतर आरोपीचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलिस करत आहेत. त्याला केवळ तरुणीला घाबरवायचं होतं की तिच्यासह तिच्या संपूर्ण कुटुंबाला इजा पोहोचवायची होती, याचाही तपास केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

आरोपीला अटक; २४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दीपेश रस्तोगी याला अटक केली आहे. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनीही आरोपीच्या अटकेला दुजोरा दिला आहे. "आम्ही आरोपीला अटक केली असून, त्याला २४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दिली.

दरम्यान, ब्रेकअपचा राग मनात धरून तरुणीच्या घराच्या दरवाजालाच आग लावल्याच्या या घटनेमुळे डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

Dombivli : २४ तासांऐवजी ३६ तास पाणीपुरवठा बंद; रहिवासी वैतागले; कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू

अग्निवीरांचा डेटा विकण्याचा प्रयत्न; ५०० डॉलरसाठी १४ वर्षीय हॅकरचे कृत्य

उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर; राहुल गांधींची घेणार भेट

सीमांकन विधेयकासाठी बहुमताच्या शोधात - काँग्रेस