Dombivli : आरोग्य विभागाची घरोघरी जाऊन पाहणी; MIDC परिसरातील पाण्याची होणार तपासणी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

Dombivli : आरोग्य विभागाची घरोघरी जाऊन पाहणी; MIDC परिसरातील पाण्याची होणार तपासणी

डोंबिवली एमआयडीसी परिसरात नळाच्या पाण्यात लालसर अळ्या आढळल्याच्या वृत्ताची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. दैनिक ‘नवशक्ति’मध्ये मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने मिलापनगर परिसरात पाहणी केली.

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरात नळाच्या पाण्यात लालसर अळ्या आढळल्याच्या वृत्ताची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. दैनिक ‘नवशक्ति’मध्ये मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने मिलापनगर परिसरात पाहणी केली. यावेळी संबंधित बंगल्यासह परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

मिलापनगर येथील आरएल-१३६ क्रमांकाच्या बंगल्यात पाण्यात अळ्या आढळल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच मिलापनगर आणि आजूबाजूच्या निवासी परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांची चौकशी केली. परिसरातील रहिवाशांना साथीचे किंवा इतर जलजन्य आजार झाले आहेत का, याची माहितीही संकलित करण्यात आली.

आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता हुले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक भाऊसाहेब हरणे आणि त्यांच्या पथकाने ही पाहणी केली. गुरुवारीही परिसरात पाहणी सुरू ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या आरोग्य विभागानेही या प्रकाराची दखल घेत स्थानिक प्राधिकरणांकडून अहवाल आणि माहिती मागविण्याची तयारी केल्याचे समजते.

मंगळवारी एमआयडीसीकडून पुरवठा होणाऱ्या पाण्यात लालसर अळ्या आढळल्यानंतर एमआयडीसी प्रशासनानेही पाण्याचे नमुने घेतले होते. बुधवारी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत आणि केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता हुले यांनी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. पाण्याच्या वाहिन्या आणि साठवण टाक्यांचे तातडीने ऑडिट करण्यात यावे. तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : अपघात रोखण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा! हायकोर्टाचे रेल्वे, राज्य सरकारला निर्देश

ठाण्यातील टँकरना GPS यंत्रणा; टँकर माफियांच्या मनमानीला चाप, ऑनलाइन बुकिंगची सुविधा

'पक्षप्रवेश करायचा तर उघडपणेच करेन'; शिंदेंच्या बैठकीत संदेश पारकरांची उपस्थिती

राज्यात घोंघावतेय जलसंकट! पाणीसाठ्यात २८ टक्क्यांनी घट

वेळ हीच मुख्य अट मानून करार रद्द करता येत नाही; ४२ वर्षांच्या लढ्यात मूळ भाडेकरूच्या वारसदारांना दिलासा