ठाणे

यंदा गावठी आंब्याची आवक घटणार; आदिवासी बांधवांचे उत्पन्न कमी होणार

मागील दोन आठवड्यांपासून सोसाट्याचा वारा आणि दवाच्छादित वातावरणामुळे आंबे मोहरला कमालीचा फटका बसला असून यंदा गावठी आंबा दुर्मिळ होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Swapnil S

दीपक गायकवाड /मोखाडा

मागील दोन आठवड्यांपासून सोसाट्याचा वारा आणि दवाच्छादित वातावरणामुळे आंबे मोहरला कमालीचा फटका बसला असून यंदा गावठी आंबा दुर्मिळ होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पर्यायाने आदिवासी बांधवांचे हंगामी उत्पन्न घटणार आहे. यंदा परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने त्याचा आंबे मोहरवर दुर्गामी परिणाम होऊन मोहर प्रक्रिया लांबली आहे. आधीच लांबलेल्या मोहर प्रक्रियेत नुकत्याच फुलवलेल्या मोहरला ढगाळ वातावरणामुळे व वाऱ्या वावधनामुळे फुलवलेल्या मोहरला कमालीचा फटका बसला असून सर्वत्र मोहर रस्त्यावर गळून पडलेला दिसून येत आहे.

दरवर्षी निसर्गाचा वाढत चाललेला लहरीपणा तसेच वेळीअवेळी कोसळणारा पाऊस यामुळे हंगामी पिकांवर त्याचा दुर्गामी परिणाम होताना दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहरला प्रचंड धोका संभवत असतो. साधारणतः नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात होत असते व थंडीमध्येच आंब्याच्या झाडांना मोहर येण्यास सुरुवात होत असते.यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात थंडी न पडल्यामुळे आंबे मोहरला गळती लागली आहे. सलग दोन आठवड्यापासून हवामान बदलामुळे काही भागात ढगाळ वातावरणामुळे तर काही ठिकाणी दवाच्छादित वातावरणामुळे मोहरच्या अंकुरांना जोरदार फटका बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याच्या कालावधीत आंब्याच्या झाडांना मोहर फुलण्यास सुरुवात होते. त्यात मोहरला पोषक असे थंडीचे वातावरण लाभल्यास भरगच्च मोहर येत असतो. त्यातच डिसेंबर महिन्याच्या थंडीचा तडाखा जास्त वाढला तर आंब्याच्या मोहरला बहर येतो. मात्र ऐन मोहर फुलण्याच्या वेळेसच झालेल्या हवामान बदलामुळे आंबे मोहरची प्रचंड प्रमाणात वाताहात झालेली आहे. त्यामुळे यंदा गावठी आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

आदिवासी बांधवांकडे रोजीरोटीचा प्रश्न

दरवर्षी हंगामी पिकं, फळं, पालेभाज्या यांचे गाठोडे बांधून मोखाडा तालुक्यातील प्रामुख्याने खोडाळा विभागातील माता भगिनी कल्याण, डोंबिवली, पडघा, शहापूर आदी भागात विक्रीसाठी घेऊन जात असतात. यात आंबा, काजू, काजू बिया, रानभाज्या, शेवगा, पळसाची पाने, करवंद, बोर, आवळे, अळू, आंबोशी आदी हंगामी नैसर्गिक उत्पादने विकून आदिवासी बांधव आपल्या कुटुंबाची गुजराण करत असतो. यावर्षी काजू खडलेले असले तरी काजू बियांनी आधार दिल्याने प्रपंचाला हातभार लागला आहे. परंतु आंबा, आंबोशी याच्यावरच कुटुंबाच्या पालनपोषणाची खरी मदार असून नेमका आंबेमोहरानेच पाठ दाखवल्याने हातचा रोजगार जाणार असल्याने आदिवासी बांधवांमध्ये नैराशेचे वातावरण आहे.

आमच्या भागातून दरवर्षी मुबलक प्रमाणात कच्चा गावठी आंबा, लोणच्याचा आंबा, साका, पिकलेला आंबा, माव्हऱ्याच्या भाजीत वापरण्यासाठी लागणारी आंबोशी, करवंदाचा ठेचा यांची विक्री कल्याण -डोंबिवली आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे उत्पन्नाचे एक साधन होत असते. मात्र यावर्षी मोहर गळतीमुळे, मोहर घटल्यामुळे आम्हाला हंगामी उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. - भिका वारे, दूधवड्याची वाडी, मोखाडा

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन