Kalyan : आंतरजातीय विवाहाचा राग मनात धरला; वडिलांकडून मुलीची निर्घृण हत्या 
ठाणे

Kalyan : आंतरजातीय विवाहाचा राग मनात धरला; वडिलांकडून मुलीची निर्घृण हत्या

कल्याणमधील पारेकरवाडी येथे आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून वडिलांनीच मुलीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली...

Mayuri Gawade

कल्याणमधील पारेकरवाडी परिसरात एका वडिलांनी आपल्या मुलीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून ही हत्या केल्याचा आरोप असून पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

मृत तरुणीची ओळख गायत्री वसईकर अशी झाली असून आरोपी वडिलांचे नाव विनोद वसईकर आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी तीन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर ताब्यात घेतले.

प्रेमविवाहाला कुटुंबाचा विरोध

मिळालेल्या माहितीनुसार, गायत्रीने नोव्हेंबर २०२५ मध्ये कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता दुसऱ्या जातीतील तरुणासोबत विवाह केला होता. यापूर्वी कुटुंबाने आणलेल्या दोन विवाह प्रस्तावांनाही तिने नकार दिला होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी ती काही वैयक्तिक कामानिमित्त माहेरी आली होती. कुटुंबीय तिच्याशी नेहमीप्रमाणे वागत होते. इतकेच नव्हे तर सर्वांनी एकत्र चित्रपटही पाहिला होता.

घरात दोघेच असताना वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री आणि तिचे वडील घरात एकटे असताना दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी धारदार शस्त्राने मुलीवर वार केल्याचा आरोप आहे.या हल्ल्यात गायत्रीच्या कपाळासह शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या. तिचा जागीच मृत्यू झाला.

आई घरी आल्यानंतर उघडकीस आला प्रकार

घटना घडली तेव्हा गायत्रीची आई घराबाहेर होती. ती घरी परतल्यानंतर तिला मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर तिने मुलाला माहिती दिली आणि पोलिसांना कळवले. दरम्यान, आरोपी विनोद वसईकर घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला.

तीन दिवसांच्या शोधानंतर अटक

आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. अखेर तीन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. मुलीचा आंतरजातीय विवाह आपण स्वीकारू शकलो नाही, असे त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

मुंबई 'पाताळलोक'चे काम वेगवान; ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भुयारी बोगद्याचे ६५० मीटर खोदकाम पूर्ण

३६४ बसवाहकांची BEST मध्ये सरळसेवा भरती; १ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Mumbai : नगरसेवक रमेश म्हात्रे प्रकरणाचा तपास आता डीसीपींकडे; डॉक्टरांना मारहाण करणे चांगलेच भोवले

FDA ची कारवाई बेकायदेशीर; दूध विक्रेत्यांचे परवाने निलंबनाच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती