कल्याण : RTO च्या तीन एकर जागेवर अतिक्रमण; रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची वेळ, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आवाहन 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

कल्याण : RTO च्या तीन एकर जागेवर अतिक्रमण; रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची वेळ, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आवाहन

कल्याणच्या उंबर्डे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाच्या तीन एकर जागेपैकी ८,२२० चौरस मीटर जागेवर बांधकाम असून, उर्वरित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची माहिती आरटीओ विभागाने दिली आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याणच्या उंबर्डे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाच्या तीन एकर जागेपैकी ८,२२० चौरस मीटर जागेवर बांधकाम असून, उर्वरित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची माहिती आरटीओ विभागाने दिली आहे. जागा अपुरी पडत असल्याने सध्या रस्त्यावर उघड्यावर वाहन चालविण्याची चाचणी घेतली जात असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी माळेकर ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

शासनाने तब्बल १० कोटी ४६ लाख २५ हजार ९४२ रुपये खर्च करून सुसज्ज आरटीओ कार्यालय उभारले असताना, तीन एकर जागेचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न माळेकर ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने उपस्थित केला आहे. भाजप वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा डोंबिवली रिक्षाचालक-मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर म्हणाले, आरटीओच्या पत्रातच त्यांच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मग हे अतिक्रमण कधी हटविणार? ही जागा नागरिकांच्या सुविधेसाठी आहे; अतिक्रमणधारकांसाठी नाही.

नांदिवली येथे स्वयंचलित वाहनचालक चाचणी केंद्र (ADTT) उभारण्यात येणार असल्याचे आरटीओने पत्रात नमूद केले आहे. मात्र, हे केंद्र पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षे लागू शकतात. तोपर्यंत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड आणि टिटवाळा परिसरातील नागरिकांना उन्हात-पावसात रस्त्यावर उभे राहावे लागणार का, असा सवाल माळेकर यांनी केला.

सध्या चाचणी घेतल्या जाणाऱ्या ठिकाणी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, सावली तसेच स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने विशेषतः महिलांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. आरटीओच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवून त्याच आवारात ड्रायव्हिंग टेस्ट सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अनेक वर्षांपासून अतिक्रमण

उंबर्डे येथील आरटीओ कार्यालयाच्या तीन एकर जागेपैकी ८,२२० चौरस मीटर जागेवर बांधकाम आहे. उर्वरित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, हे अतिक्रमण अनेक वर्षांपासून असल्याचे सांगण्यात येते. याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी नमूद केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Mumbai : लालबागच्या राजाच्या प्रसादातून वीज निर्मिती; ४२ टन ओला कचरा जैविक प्रक्रियेत, रुग्णालयातील वॉर्डला मिळणार वीज

Mumbai : पालिका शाळांत आता रोबोटिक्सचे धडे; IIT मुंबईच्या मदतीने तंत्रज्ञानाचे शिक्षण, ५० शिक्षक-अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोष

AI बनतोय मुलांचा शिक्षण सहाय्यक; 'क्राय' संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष