कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात अश्लील मेसेज आणि विनयभंग करणाऱ्या दुकानदाराला एका तरुणीने थेट चपलेने बदडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. इतकेच नव्हे तर दुकानदाराला तरुणीच्या नातेवाइकांनी पाय धरून माफी मागण्यासही भाग पाडले.
सविस्तर माहितीनुसार, कल्याण येथील कोळशेवाडी येथे दुकानात काम करणाऱ्या तरुणीला दुकान मालक सतत अश्लील मेसेज पाठवायचा. त्याने तीची छेड काढण्याचाही प्रयत्न केल्याचे समजते. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने अखेर हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी थेट दुकानाकडे मोर्चा वळवला आणि सर्वांसमोर दुकानदाराला चांगलाच धडा शिकवला.
पाहा व्हिडिओ -
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते, की तरुणी दुकानदाराला चपलेने मारत आहे. यावेळी ती रडतानाही दिसत आहे. एवढेच नाही, तर मारल्यानंतर कुटुंबीयांच्या दबावाने दुकानदाराने तरुणीची पाय धरून माफी मागीतल्याचे दिसते.
स्थानिकांच्या मते, संबंधित दुकानदाराने यापूर्वीही इतर मुलींसोबत गैरवर्तन केले असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या घटनेनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.