फरियाल सय्यद/ठाणे
ऐतिहासिक ठाणे मध्यवर्ती कारागृह स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला पुन्हा एकदा वेग आला असून, राज्य सरकारने भिवंडी तालुक्यात नवीन कारागृह उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी विद्यमान कारागृह स्थलांतरित करण्यास पुन्हा विरोध दर्शवला आहे. वाढत्या कैद्यांची संख्या लक्षात घेता नवीन कारागृह उभारावे; मात्र ऐतिहासिक कारागृहाचे अस्तित्व कायम ठेवावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृहाला ऐतिहासिक महत्त्व असून, ते पाडण्यात येऊ नये किंवा अन्यत्र स्थलांतरित करू नये, असे केळकर यांनी स्पष्ट केले. सरकारने नवीन कारागृहाची उभारणी करावी आणि सध्याचे कारागृह जतन करावे, असे त्यांनी सांगितले. कारागृह स्थलांतरित केल्यास न्यायालये आणि रुग्णालयांपासूनचे अंतर वाढणार असून, त्यामुळे कैद्यांसमोर अतिरिक्त अडचणी निर्माण होतील, असेही त्यांनी नमूद केले.
भिवंडीतील प्रस्तावित जागा सध्याच्या कारागृहापासून सुमारे ३० किमीवर आहे. कारागृह स्थलांतरित झाल्यास मुंबई, ठाणे आणि रायगड येथील न्यायालयांमध्ये सुनावणीसाठी कैद्यांना ने-आण करणे कठीण होऊ शकते. तसेच वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचण्याचे आव्हानही वाढणार आहे.
तातडीच्या उपचारांसाठी कैद्यांना ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवले जाते, तर विशेष उपचारांसाठी अनेकदा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात न्यावे लागते. प्रस्तावित नवीन कारागृहापासून जे. जे. रुग्णालयाचे अंतर सुमारे ६० किलोमीटर असण्याची शक्यता आहे. नवीन कारागृहाच्या उभारणीसाठी सरकारी परवानग्या, बांधकाम मंजुरी आणि अन्य प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत.
५ हजार कैद्यांच्या क्षमतेचे कारागृह प्रस्तावित
भिवंडी तालुक्यातील पिसे, आमणे आणि वाशेरे परिसरातील संभाव्य जागांची प्रशासनाकडून तपासणी सुरू आहे. सुमारे ५० एकर क्षेत्रफळाच्या जागेवर ५,००० कैद्यांची क्षमता असलेले नवीन कारागृह उभारण्याचा विचार आहे. संबंधित जमिनीची पाहणी करून बांधकाम आराखडा आणि प्रकल्पाच्या अंदाजित खर्चाचा तपशील तयार करण्याचे निर्देश एमएसआयडीसीला देण्यात आले आहेत.