माथेरान : माथेरानमधील हनिमून पॉइंट परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे दीड वाजता हनिमून पॉइंटजवळील गणेश सणसगरे यांच्या घराबाहेरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याची शिकार केली. ही संपूर्ण घटना घराबाहेर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, बिबट्याच्या हालचालींची खात्री झाली आहे.
यापूर्वीही महिनाभरापूर्वी याच परिसरातील संदीप जाबरे आणि उज्वला चौधरी यांच्या पाळीव कुत्र्यांची बिबट्याने शिकार केली होती. तसेच माथेरान-दस्तुरी नाका मार्गावरील माऊंटबेरी परिसरातही बिबट्याचे वारंवार दर्शन झाल्याने त्याचा वावर वाढल्याची चर्चा आहे. दरम्यान, सीसीटीव्हीत बिबट्याचे दर्शन कैद झाल्यानंतर नागरिकांनी वन विभागाने गस्त वाढवून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
माथेरानच्या जंगलात दोन ते तीन वर्षे वयोगटातील बिबट्याचे तीन बछडे वास्तव्यास आहेत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांनी सतर्क राहावे, जंगलालगतच्या परिसरात विनाकारण फिरणे टाळावे आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे.जयवंत चिमटे, वनरक्षक