ठाणे : राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. दरम्यान, आज प्रचाराचा ‘सुपरसंडे’ रोड शो, बार्ईक रॅली आणि मतदारांच्या भेटीगाठी आणि वाटाघाटींनी गाजला. सकाळी ९ वाजल्यापासून विविध पक्षांचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा बाईकला लावून रस्त्यावर पडले तर वरिष्ठ नेते जीप व इतर चारचाकी वाहनांतून उमेदवारांच्या प्रचारासाठी जनतेला विनवणी करताना दिसत होते. उद्या प्रचाराचा अंतिम दिवसही बाईक रॅली आणि भेटीगाठी, चौक सभा, रोड शोने समाप्त होईल.
ठाणे जिल्ह्यात २८१ उमेदवार रिंगणात असून रविवार हा प्रचाराचा ‘सुपरसंडे’ ठरला. महायुतीकडून ‘लाडक्या बहिणीं’साठी भावाचे साकडे, विरोधकांची टिका-टिप्पणी आणि अपक्षांचाही बोलबाला आजच्या प्रचार फेऱ्यांमधून दिसून आला. ठाणे मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय केळकर, मनसेचे अविनाश जाधव, उबाठाचे राजन विचारे यांनी आपल्या परिने शक्तीप्रदर्शन दाखविताना दिसले.
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कल्याण पश्चिमचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार सचिन बासरे यांनी रविवार काळा तलाव येथील बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले. बासरे यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र आदरांजली वाहिली.
ओवळा-माजिवड्यात सरनाईकांचे वर्चस्व असले तरी मनसेचे संदीप पाचंगे आणि उबाठाचे नरेश मणेरा यांनीही ‘हम भी किसीसे कम नही’च्या तोऱ्यात मतदारसंघात चांगलीच हवा निर्माण केली आहे. तर मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याणमध्येही महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
लता शिंदे, वैशाली शिंदे मैदानात
कोपरी-पाचपाखाडीत लता शिंदे यांनी कोपरीसह वागळे इस्टेट परिसर पिंजून काढला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, वैशाली शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण कुटुंबीय निवडणूक प्रचारात उतरल्याने यंदाची निवडणूक खूपच प्रतिष्ठेची झाल्याचे दिसून आले.
कल्याणमध्ये खासदार रवी किशन यांचे आवाहन
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजन करण्यात आले होते. प्रचार फेरीची सुरवात अवध रामलीला समिती येथून म्हात्रे नाका, काटेमानिवली नाका, नाना पावशे चौक, जनता बँक, काली माता मंदिर येथे समारोप करण्यात आली. या फेरीची खासदार रवी किशन यांनी आपल्या भोजपुरी शैलीत सर्व उत्तर भारतीय समाज बांधवांना सुलभा गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले.
डोंबिवलीत प्रचार रॅली
शांतताप्रिय डोंबिवली शहराच्या उन्नतीसाठी डोंबिवली फास्ट ते डोंबिवली फर्स्ट हा वसा घेतला आहे. हा वसा हाती घेऊनच गेल्या २०-२५ वर्षांपासून वाटचाल करत आहे आणि निरंतर करत राहणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. प्रत्येक डोंबिवलीकराशी मी एका भावनिक नात्याने जोडला गेलो आहे. निवडणूकनिमित्त त्यांची शहरात रविवारी पूर्वेला प्रचार रॅली काढण्यात आली होती.
भिवंडीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
भिवंडी : विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात विधानसभेच्या उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिला असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह वाढला आहे. मात्र यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली असून अपक्ष तथा बंडखोर उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची कमी दिसून येते.
भिवंडी शहरामध्ये काही ग्रामीण भाग जोडून तयार झालेल्या भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आता प्रचारसभेवर जोर न देता पायी नागरिकांच्या व मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. काहींनी दररोज स्थानिक सोशल मीडियाला हाताशी धरून आपल्या भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. मात्र सत्ताधारी असलेले भिवंडी पश्चिमचे उमेदवार महेश चौघुले (भाजप) तर भिवंडी पूर्वचे उमेदवार संतोष शेट्टी (शिंदे शिवसेना) यांनी ठिकठिकाणी छोट्यामोठ्या सभा आयोजित करीत मतदारांना आपल्या भूमिका आणि भविष्यातील योजना पटवून देत आहेत. महाआघाडीने भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादीचे रईस शेख यांना उमेदवारी दिली. त्यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून भिवंडीचे खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे आणि प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी हे भूमिका बजावीत आहेत.
मात्र भिवंडी पश्चिममध्ये काँग्रेसची उमेदवारी दयानंद चोरघे यांना दिली असली तरी त्यांच्या समोर समाजवादी पक्षाचे रियाझ आझमी आणि काँग्रेसच्या बंडखोर आस्मा जव्वाद चिखलेकर हे आघाडी पक्षाचे घटक उमेदवारी करीत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
भिवंडी पश्चिममधील काँग्रेसच्या उमेदवारावर होणार आहे,असे बोलले जात आहे. तरी देखील काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने देखील मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार सुरू ठेवला आहे.