उल्हासनगर : १९९६ मध्ये उल्हासनगर नगरपरिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले आणि त्या दिवसापासून महापालिकेच्या सर्वोच्च प्रशासकीय पदावर पुरुष अधिकाऱ्यांचेच वर्चस्व होते. मात्र, २७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी प्रथमच आयएएस महिला अधिकारी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली आहे. हा ऐतिहासिक बदल उल्हासनगरसाठी आणि महिलांच्या नेतृत्वासाठी एक नवा आदर्श ठरणार आहे. तसेच उल्हासनगर महापालिकेच्या तब्बल १२ मुख्य पदांवर देखील महिला अधिकारीच नियुक्त आहेत. त्यामुळे महिलांच्या कर्तृत्वाला नवी दिशा देणाऱ्या या निर्णयामुळे महानगरपालिकेत "महिलाराज"ची नवी पहाट उगवली आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय क्षेत्रात आधीपासूनच महिलांचा ठसा आहे. विविध महत्त्वाच्या पदांवर महिलांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. मनीषा आव्हाळे यांच्या आयुक्तपदी नियुक्तीने या महिलांना नवा आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळाली आहे.
आयएएस अधिकारी आव्हाळे यांनी त्यांच्या कर्तृत्वाने आधीच प्रशासकीय क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. त्यांची नेमणूक महिलांच्या नेतृत्वाला अधिक बळ देणारा एक ऐतिहासिक टप्पा आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे महापालिकेच्या कारभारात शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि गती येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या इतिहासात महिला आयुक्तांची ही पहिलीच वेळ आहे. हा बदल केवळ प्रशासकीय स्तरावरच नाही, तर समाजात महिलांच्या नेतृत्वासाठी एक आदर्श उदाहरण ठरणार आहे. महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महानगरपालिका शहराचा विकास साधून महिला सक्षमीकरणाच्या दिशेनेही एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलेल.
उल्हासनगरचा हा ऐतिहासिक बदल महिलांसाठी आदर्श घडवणारा ठरेल, यात शंका नाही. उल्हासनगर महानगरपालिकेत महिलांचे वाढते नेतृत्व समाजाला नवा विचार आणि दिशा देत आहे.
विशाखा मोटघरे - उपायुक्त
मयुरी कदम - सहायक आयुक्त
प्राजक्ता कुलकर्णी - सचिव
छाया डांगळे - जनसंपर्क अधिकारी
निलम कदम - कर निर्धारक व संकलक
कुंदा पंडित - प्रभारी प्रशासन अधिकारी
अलका पवार - प्रभाग समिती सहायक आयुक्त
सलोनी निवकर - प्रभाग समिती सहायक आयुक्त
श्रद्धा बाविस्कर - सिस्टम अनालिस्ट
मधुरा केणी - मालमत्ता व्यवस्थापक
संजीवनी अमृतसागर - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग प्रमुख
मोहिनी धर्मा - वैद्यकीय आरोग्य अधिकारी