ठाणे

पाण्यासाठी मुंब्र्यातील महिला आक्रमक; TMC आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या

पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करूनही ठामपा प्रशासनाकडून मुंब्र्यावर अन्याय केला जात आहे.

Swapnil S

ठाणे : पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करूनही ठामपा प्रशासनाकडून मुंब्र्यावर अन्याय केला जात आहे. मुंब्रा-कौसाच्या वाट्याचे १७ लाख लिटर पाणी चोरले जात आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली ठामपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आता आम्ही केवळ गुलाब दिले आहे. आणखी दोनवेळा गुलाब देऊ नंतर रिकामे हंडे फेकू, असा इशारा पठाण यांनी दिला.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा, कौसा परिसरात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, यासाठी मुंब्रा परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली असून पालिकेकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. पाण्याचा पुरवठा नियमित होत नसल्याने नागरिकांना चक्क पाणी माफियांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्या निषेधार्थ मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मर्जिया पठाण आणि सुमारे २५ ते ३० महिलांनी ठामपा आयुक्त सौरव राव यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते विनोद पवार यांनी मर्जिया पठाण यांची भेट घेतली. पाणी वितरण व्यवस्थेच्या रिमोल्डिंगचे काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन पवार यांनी दिले.

मुंब्रा - कौसा परिसरात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान सोमवारी या भागातील महिलांनी मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे हत्यार उपसले.

पाणी माफिया गब्बर होताहेत

ठाणे पालिकेकडून वारंवार अशीच उत्तरे दिली जात आहेत. एकीकडे १७ लाख लिटर पाण्याची दररोज चोरी होत आहे. या चोरीमागे पाणी माफिया की व्हॉल्वमॅन आहेत, याचा शोध पालिकेने घ्यायला हवा. पण, तो घेतला जात नाही. सामान्य नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असताना पाणी माफिया गब्बर होत आहेत. आज हे शांततेत आंदोलन झाले आहे. पुन्हा दोन वेळा आम्ही ठामपा अधिकाऱ्यांना गुलाबाची फुले देऊ. त्यानंतरही जर पाण्याची टंचाई संपली नाही तर रिकामे हंडे आणि कळशा अधिकाऱ्यांना देऊ, असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल