नामदेव शेलार/ मुरबाड
मुरबाड-शहापूर-कर्जत मार्गावरील काळू नदीवर बांधलेल्या नव्या पुलाला उद्घाटनाआधीच मधोमध मोठे भगदाड पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम आणि पायाभूत सुविधा विभागाच्या (MSRDC) अखत्यारित हे काम सुरू असून, केवळ दोन वर्षांपूर्वी उभारलेला हा पूल सध्या मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या रस्त्याचे आणि पुलाचे काम जिजाऊ कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीमार्फत करण्यात आले असून, सदर कंपनीचे मालक निलेश सांबरे हे सध्या सत्ताधारी शिंदे गटाचे उपनेते आहेत. त्यामुळे या अपुऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित होत असून, ठेकेदारावर कारवाई करणार की नाही? असा सवाल नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते विचारू लागले आहेत.
मुरबाड-शहापूर-कर्जतला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-अ हा तीन तालुक्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र या मार्गाचे काम गेली पाच वर्षे कासवगतीने सुरू आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी खोदकाम अपूर्ण असल्याने अपघातांची मालिका सुरू असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
या मार्गावरील काळू नदीवर उभारण्यात आलेला पूल केवळ दोन वर्षांतच भेगांनी पोखरला गेला आहे. पुलाच्या मधोमध पडलेले भगदाड अत्यंत धोकादायक असून, अजूनही यावरून अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका नाकारता येत नाही.
नागरिकांनी तत्काळ वाहतूक बंद करून तपासणी व दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या पुलाखालून वाढलेल्या वड-पिंपळाच्या मुळ्यांमुळे त्याची मजबुती ढासळली असून, केवळ रंगरंगोटी करून दिखावा करण्यात आला आहे.
सार्वजनिक निधीच्या अपव्ययाची भावना
दुसऱ्या बाजूला, मुरबाड-सरळगाव मार्गे शहापूरला जाणारा संगमेश्वर येथील काळू नदीवरील पूल देखील जीर्ण अवस्थेत असून तोही वापरण्यास धोकादायक बनला आहे. या दोन्ही पुलांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून, कोणतीही दुर्घटना घडण्याआधीच शासनाने लक्ष घालून ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय करून बांधलेले हे रस्ते आणि पूल जनतेच्या जीवाशी खेळत असल्याची भावना स्थानिकांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे.