मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रसिद्ध झालेल्या नव्या प्रारूप मतदार यादीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. पुनरीक्षणापूर्वी मतदारसंघात ४ लाख ९१ हजार ९८० मतदार होते. त्यापैकी ३ लाख ५७ हजार ५७४ मतदारांचा नव्या प्रारूप यादीत समावेश करण्यात आला आहे. तर १ लाख ३४ हजार ४०६ मतदारांची नावे, म्हणजेच २७.३२ टक्के मतदारांची नावे विविध कारणांमुळे वगळण्यात आली आहेत.
नव्या यादीत २ लाख ८२ हजार ३६२ पुरुष, १ लाख ७४ हजार ३०५ महिला आणि सात तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मुरबाड नगरपंचायतीच्या मतदारसंख्येतही सुमारे पाच हजारांची घट झाली आहे. पूर्वी सुमारे १८ हजार ५०० मतदार असताना आता ही संख्या सुमारे १३ हजार ५०० वर आली आहे. पुनरीक्षण प्रक्रियेत ६६ हजार ११३ सुनावण्या, ३३ हजार ६८८ ‘नो मॅपिंग’ आणि ३२ हजार ५२८ ‘डिस्क्रेपन्सीज’ प्रकरणांची नोंद झाली आहे. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.