बदलापूर : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महायुतीतील शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही नगराध्यक्षपदाची इच्छा व्यक्त करीत या स्पर्धेत उडी घेतली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत महायुतीत काय निर्णय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची आगामी सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची सत्ता माझ्या हातात द्या आणि विकास पहा, असे सांगत भाजपने पालिकेत एकहाती सत्ता मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनीही आगामी पालिका निवडणुकीत शिवसेना हाच नंबर वनचा पक्ष राहील आणि नगराध्यक्षही शिवसेनेचा राहील, असा दावा केला आहे.
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत शिवसेना-भाजप १९९५ ची सार्वत्रिक निवडणूक वगळता स्वतंत्रपणे लढले आहेत. आताही त्यांची इच्छा असेल तर आगामी पालिका निवडणूकही स्वबळावर लढवावी, म्हणजे बदलापूरची जनता कुणाबरोबर आहे, ते समजेल. असे सांगत शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविण्यास सक्षम असल्याचा इशाराही म्हात्रे यांनी दिला आहे. असे असतानाच राष्ट्रवादीनेही नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत उडी घेतली आहे.
ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झोकून देत काम करून युतीधर्माचे पालन केले आहे. त्याचा फायदा शिवसेना व भाजपच्या उमेदवारांना झाला आहे. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत छोटा भाऊ म्हणून नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीला संधी द्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केली आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेला व बदलापुरात राष्ट्रवादीला नगराध्यक्षपदी संधी देऊन महायुती याबाबत समतोल राखू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
मिनी विधानसभा ठरणारी निवडणूक
कुळगाव बदलापूर नगर परिषदेत सन २००५ मध्ये नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झाली होती. या निवडणुकीत भाजपाचे राम पातकर विजयी झाले होते. त्यानंतर आता आगामी सार्वत्रिक निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. ही निवड पाच वर्षांसाठी असणार आहे. त्याशिवाय मुरबाड मतदार संघात सर्वाधिक मतदार कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात आहेत. त्यामुळे ही निवडणूक मिनी विधानसभा निवडणूक ठरणार असल्याने नगराध्यक्ष पदासाठी महायुतीत रस्सीखेच वाढत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युतीधर्माचे पालन करून राष्ट्रवादीने प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवारांचे काम केले. त्यामुळे छोटा भाऊ म्हणून राष्ट्रवादीला नगराध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे.
कॅप्टन आशिष दामले
प्रदेश सरचिटणीस,राष्ट्रवादी काँग्रेस