ठाणे

नवीन ठाणे स्थानकापुढील अडसर दूर; उच्चदाब वीज वाहिनीच्या समस्येवर महिन्याभरात तोडगा - पालिका आयुक्त

ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाच्या शेजारील उच्चदाब वीज वाहिनीच्या समस्येवर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

Swapnil S

ठाणे : ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाच्या शेजारील उच्चदाब वीज वाहिनीच्या समस्येवर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाणे आणि मुलुंडदरम्यान मनोरुग्णालयालगत ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी अनुषंगिक कामे रेल्वेकडून तर, परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात येत आहेत. त्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, महावितरणचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान या प्रकल्पाशी निगडित वेगवेगळ्या विषयांची आयुक्त राव यांनी माहिती घेतली. मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या उच्चदाब वीज वाहिनीमुळे काम थांबू नये, यासाठी आयुक्तांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत तात्पुरती उपाययोजना आणि महिनाभरात पर्यायी उपाययोजना काढण्याचे निर्देश दिले. तसेच, या वाहिनीचा टॉवर हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे, महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा, असेही आयुक्तांनी सांगितले.

नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबतही तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान, आयुक्त राव यांनी आतापर्यंत झालेले काम, पोहोच मार्गाचे काम, पूल आदी कामांचा आढावा घेतला.

नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाविषयी माहिती

ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे-मुलुंड स्थानकादरम्यान प्रस्तावित नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची १४.८३ एकर जागा उपलब्ध होणेबाबत मा.मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानुसार स्टेशनकरीता आवश्यक असलेल्या जागेमध्ये असलेल्या ०५ महिला रुग्ण कक्षासाठी महापालिकेने नवीन वास्तू बांधून दिलेली असून त्याचा वापर सुरू झाला आहे.

रुग्ण कक्ष स्थलांतरीत झाल्यामुळे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे काम माहे ऑक्टोबर २०२३ पासून सुरु करण्यात आले आहे.

या नवीन स्थानकाकडे जाण्यासाठी ०३ मार्गिका असून ०१ मार्गिका पूर्व द्रुतगती मार्गास जोडण्यात येणार आहे.

या स्थानकाच्या कामासाठी एकूण रु. ११९ कोटी ३२ लक्ष तसेच जोडरस्ते आणि Circulating Area विकसीत करणेसाठी रु. १४३ कोटी ७०लक्ष असा एकूण रु. २६३ कोटी ०२ लक्ष इतका खर्च येणार आहे. हे काम ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे.

नवीन स्थानकाचा फायदा प्रामुख्याने वागळे इस्टेट, घोडबंदर रोड परिसरामधील नागरिकांना होणार आहे. तसेच भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी सदर स्थानक उपयुक्त ठरणार आहे.

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा