उल्हासनगर : मुंबईच्या कुर्ला परिसरात बेस्ट बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या भीषण अपघाताने बस प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा केला आहे. या पार्श्वभूमीवर, उल्हासनगर महापालिकेने आपल्या परिवहन बसचालकांच्या आरोग्य आणि कामकाजाची तपासणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'प्रत्येक चालक फिटनेस व प्रशिक्षिततेच्या कसोटीवरच बस चालवू शकतो,' अशी प्रतिक्रिया उल्हासनगर महापालिकेतील परिवहन विभाग प्रमुख विनोद केणी यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेने केंद्र शासनाच्या एनकेएपी योजनेंतर्गत शहरासाठी २० अत्याधुनिक ई-बसेस सुरू केल्या आहेत. या पर्यावरणपूरक बसेस, १० एसी आणि १० नॉन एसी, उपनगरांपासून शहरांपर्यंत हजारो प्रवाशांच्या सेवेत आहेत. महापालिकेच्या बसेससाठी आवश्यक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले आहेत. बस चालवण्यासाठी ५० चालक, ५० वाहक, तसेच तांत्रिक देखरेखीसाठी कर्मचारी व्यवस्थापित करण्यात आले आहेत. प्रत्येक बससाठी दोन वीज चार्जिंग सेंटर उभारण्यात आले असून, दैनंदिन व्यवस्थापनासाठी आगारप्रमुख व उपप्रमुखांची नियुक्तीही करण्यात आली आहे. उल्हासनगर महापालिका परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, प्रत्येक चालकाला बस चालवण्यापूर्वी एका महिन्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय, प्रत्येक चालकाच्या शारीरिक आणि मानसिक फिटनेसची वेळोवेळी तपासणी केली जाते. 'या उपायांमुळे गेल्या ९ महिन्यांत एकही गंभीर बस अपघात झाला नाही,' असे विनोद केणी यांनी सांगितले.
कुर्ला अपघातासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी उल्हासनगर महापालिका सज्ज झाली आहे. चालकांच्या फिटनेस आणि तांत्रिक कौशल्यावर विशेष लक्ष देऊन नागरिकांसाठी अधिक सुरक्षित प्रवास सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. उल्हासनगर महापालिकेची बससेवा ही फक्त प्रवासाचा पर्याय नसून, ती पर्यावरणपूरकतेला प्रोत्साहन देणारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारी योजना ठरत आहे.
१०० नवीन बसेस उल्हासनगरसाठी मंजूर
बससेवेसाठी आवश्यक असलेली बस आगार आणि दुरुस्ती केंद्रांची व्यवस्था अद्याप पूर्णपणे उभी राहिलेली नाही. मात्र, केंद्र शासनाकडून स्वतंत्र निधी मंजूर झालेला असल्याने लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी आशा आहे. केंद्र शासनाने उल्हासनगरसाठी १०० नवीन बसेस मंजूर केल्या आहेत. भविष्यात शहरांतर्गत सेवा वाढवून अधिकाधिक नागरिकांना याचा लाभ मिळवून देण्याचा महापालिकेचा मानस आहे.
दिवसाला १६० किमी प्रवास अनिवार्य
सध्या १० एसी बसेस कल्याण, अंबरनाथ, बदलापूर मार्गांवर धावत असून, शहरांतर्गत १० नॉन एसी बसेस प्रवाशांची सेवा करत आहेत. प्रत्येक बसने दिवसाला किमान १६० किमी प्रवास करणे अनिवार्य आहे. यासाठी महापालिका ठेकेदाराला १५.६५ रुपये प्रति किलोमीटर दराने मोबदला देते. नागरिकांकडून या सेवेला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रवाशांना आरामदायी आणि किफायतशीर सेवा उपलब्ध झाली आहे.
बस चालवण्यासाठी ५० चालक, ५० वाहक, तसेच तांत्रिक देखरेखीसाठी कर्मचारी तत्पर असून प्रत्येक चालकाला बस चालवण्यापूर्वी एका महिन्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय, प्रत्येक चालकाच्या शारीरिक आणि मानसिक फिटनेसची वेळोवेळी तपासणी केली जाते. या उपायांमुळे गेल्या ९ महिन्यांत एकही गंभीर बस अपघात झाला नाही.
- विनोद केणी,
परिवहन विभाग प्रमुख, उल्हासनगर महापालिका