मुंबई : भिवंडी रोड स्थानकाजवळ अद्ययावत ‘ऑल-वेदर सबवे यशस्वीरीत्या सुरू केल्यानंतर, मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) रेल्वे रुळांवरील अवैध वावर आणि प्राणघातक अपघात रोखण्यासाठी अशाच प्रकारच्या ३ ते ४ संवेदनशील ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याची योजना आखली आहे. यामध्ये ठाणे-दिघा, सानपाडा कारशेड आणि टिटवाळा-खडवली या मार्गांचा समावेश आहे.
रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देणे आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रस्तावित भुयारी मार्ग सध्या नियोजन टप्प्यात आहेत. तीन ठिकाणे निश्चित केली असून चौथ्या ठिकाणाची निवड अजून ‘एमआरव्हीसी’ने जाहीर केलेली नाही. नवीन भुयारी मार्गांचे अचूक डिझाइन आणि आकारमान निश्चित होणे बाकी आहे. मात्र, भिवंडी रोड येथील प्रकल्प या प्रस्तावित भुयारी मार्गांसाठी मॉडेल म्हणून मानला जात आहे.
भिवंडी रोड स्थानकाजवळील सबवे पनवेल-वसई रोड विभागावरील सात चालू रेल्वे मार्गिकांखाली, रेल्वे वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता बांधला होता. हायड्रॉलिक पुश तंत्रज्ञानाचा वापर करून चालू रुळांखाली चार मोठे प्रीकास्ट रीइन्फोर्स्ड काँक्रीट सेगमेंट बसवले होते. या सुविधेत पाणी साचू नये म्हणून वॉटरप्रूफिंगचे अनेक थर आणि संरक्षणात्मक आवरणे दिली आहे.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरला लागू असलेल्या मालवाहतुकीच्या मानकांसह, जड मालवाहतूक सहन करण्यासाठी हे डिझाइन केले आहे. यात झाकलेले मार्ग, प्रकाश व्यवस्था, व्हेंटिलेशन आणि पाण्याच्या निचऱ्याची सोय केली आहे. भिवंडी येथील सबवेमुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येत असून, यामुळे रुळांवरील असुरक्षित हालचाली कमी होऊन स्थानिक संपर्क सुधारण्याची अपेक्षा आहे. संवेदनशील भागांत अशा सर्व हवामानास अनुकूल असणाऱ्या भुयारी मार्गांची पुनरावृत्ती करण्याची 'एमआरव्हीसी'ची योजना सुरक्षा आणि दळणवळण दोन्ही सुधारण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.
सुरक्षित प्रवास होणार
रेल्वे रुळ ओलांडल्याने अपघात वाढत आहेत. परिणामी अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी भुयारी मार्ग काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. जड मालवाहतुकीसह अन्य अवजड मालांची माल वाहतूक पेलवण्यासाठी या नवीन भूयारी मार्गाचे डिझाईन केले आहे. त्यामुळे भुयारी मार्ग हे पादचाऱ्यांसाठी वरदान ठरणार आहेत.