ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २२ दिवस उलटूनही तपासात ठोस प्रगती झालेली नसल्याचा आरोप त्यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी केला. हल्ल्यातील पाचवी व्यक्ती अमित सिंग नसून राजा शिंदे असल्याचा दावा करत त्यांनी राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांना अटक करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात पोलिसांना आणि वकिलांना पुरावे दिल्याचेही त्यांनी सांगितले.
राजेंद्र शिंदे यांच्या मुळशी येथील गावी काही जण बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेत असल्याचा तसेच एका व्यक्तीने आपल्या घराची रेकी केल्याचाही आरोप पूर्णेकर यांनी केला.
‘वडिलांच्या मृत्यूला २२ दिवस झाले. गेल्या २० दिवसांपासून आम्ही पोलिसांना पुरावे देत आहोत; मात्र ठोस कारवाईऐवजी केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते,’ अशी नाराजी राम पूर्णेकर यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेश एसटीएफच्या चौकशीत नगरसेवक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हत्या झाल्याचे समोर आल्याचा दावाही त्यांनी केला.
‘हल्लेखोराची ओळख लपविण्यासाठी हेल्मेट’
पत्रकार परिषदेत राम पूर्णेकर यांनी काही छायाचित्रे आणि व्हिडीओंचा उल्लेख केला. राजेंद्र शिंदे आणि संतोष टल्ली यांचा एकत्रित फोटो तसेच राजेंद्र शिंदे आणि निखिल यादव यांच्यात बंदुकीच्या देवाणघेवाणीशी संबंधित व्हिडीओ असल्याचा दावा त्यांनी केला. एका व्हिडीओमध्ये राजेंद्र शिंदे हे निखिल यादवला बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे दिसत असल्याचेही ते म्हणाले. हल्ल्यावेळी हेल्मेट घातलेली व्यक्ती राजा शिंदे असल्याचा दावा करत त्यांनी एआयच्या मदतीने केलेल्या छायाचित्रांच्या तुलनेचाही उल्लेख केला. या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
‘मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा’
‘माझा संविधानावर विश्वास आहे. वडिलांच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून मला न्याय द्यावा,’ असे आवाहन त्यांनी केले. तसेच, आपल्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.