डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील ब्राम्हण सभा येथे संभाजी भिडे हे व्याख्यानमालेसाठी येत असल्याचे समजताच डोंबिवलीतील वंचित बहुजन आघाडी, व रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत त्यांचा जाहीर निषेध केला.
रिपब्लिकन सेनेचे (पँथर) आनंद नवसागरे, राहुल नवसागरे,अर्जुन जाधव, नितीन साबळे, अरुण शिरसाट,संदीप हेरोडे, वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत पगारे, गणेश गायकवाड, वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष गौतम गवई, दीपक भालेराव, अक्षय वाटुडे, विकास ढिल्पे, करन लहाणे, युवराज साळवे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी निषेध केला. रविवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेतर्फे व्याख्यान मालिकेकरिता सभेचे आयोजन केले होते. त्यावर आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.
संभाजी भिडे हे ब्राह्मण सभेच्या दिशेने येत असताना रिपब्लिकन सेना,वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या विजयाच्या घोषणा देत 'संभाजी भिडे चले जाव,संभाजी भिडे मुर्दाबाद' च्या घोषणा देत सरकारविरोधात घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांचा निषेध व्यक्त केला. संभाजी भिडे यांनी या अगोदरही महाराष्ट्रात महापुरुषांचा, संतांचा, महिलांचा, भारतीय घटनेचा, झेंड्याचा तिरंग्याचा वेळोवेळी अवमान केला आहे.