ठाणे

ठाणे : भाजप नेत्यांचा शिंदे उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार; तर, प्रचारास विरोध म्हणजे मोदींना विरोध; शिवसेनेची भूमिका

Swapnil S

भाईंंदर : लोकसभेचे बिगुल वाजल्याबरोबरच ठाणे मतदारसंघ कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय फड रंगण्यास सुरुवात झाली आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार भाजप कार्यकर्ता करणार नसल्याचे नरेंद्र मेहता यांनी म्हटले होते. त्यावर आक्षेप घेत युतीच्या उमेदवाराचा विरोध म्हणजे नरेंद्र मोदी यांची हॅट‌्ट्रिक करण्यास विरोध अशी टीका शिवसेना शिंदे गटाने केली असून एक वादग्रस्त व्यक्ती व्यक्तिगत स्वार्थासाठी स्वतःलाच भाजप असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा खटाटोप करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे, तर स्वतः भाजपच्या जिल्हाध्यक्षसह स्थानिक नेते व आमदार यांनी देखील मोदीजींना पंतप्रधान करायचे असून युतीचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यातील अंतर्गत खदखदीचा परिणाम कसा दिसून येतो हे लवकरच कळेल.

ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक काळापासून शिवसेनेचा खासदार निवडून येत असल्याने युतीमध्ये सदर मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाने मागितला आहे. दरम्यान, मेहता यांचे समर्थक मानले जाणारे भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी मात्र, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असून भाजप कार्यकर्ते युतीचे काम करत आहेत. पक्षश्रेष्टी भाजप वा युतीचा जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याचे काम भाजप कार्यकर्ते करतील असे शर्मा म्हणाले. शिवसेना शिंदे गटाचे मीरा-भाईंदर विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रमप्रताप सिंह यांनी सांगितले की, नरेंद्र मेहतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होऊ नयेत अशी इच्छा असावी. म्हणूनच ते युतीच्या उमेदवारास विरोध करून एकप्रकारे विरोधी पक्षातील उमेदवारास फायदा होईल, अशा भूमिकेत दिसत असल्याची टीका विक्रमप्रताप यांनी केली आहे. व्यक्तिगत आकस व व्यक्तिगत स्वार्थ बाळगून विरोध करणाऱ्यांना शहराची जनता ओळखून आहे, असा टोला सिंह यांनी लगावला.

भाजपचे मीरा-भाईंदर विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड. रवी व्यास यांनी सांगितले की, भाजप व शिवसेना, राष्ट्रवादी युतीला तसेच भाजप श्रेष्ठींच्या भूमिकेविरोधात भाजप कार्यकर्ते नाहीत. कारण देशाचे नेतृत्व हे नरेंद्र मोदी यांच्या हाती तिसऱ्यांदा सोपवायचे भाजप कार्यकर्त्यांचे ध्येय आहे.

आ. मेहतांची नाराजी

आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेना शिंदे गटातून नावे चर्चेत असली तरी आ. सरनाईक यांना उमेदवारी देण्याची शक्यता अधिक आहे. आ. सरनाईक यांचे नाव चर्चेत आले असतानाच दुसरीकडे मीरा-भाईंदर भाजपमधून माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आ. सरनाईक यांचे नाव न घेता त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे मतदारसंघ भाजपकडे यावा अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास कार्यकर्ते तयार नसल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.

"पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत यासाठी भाजप व युतीचे कार्यकर्ते पक्षादेशानुसार ठाणे लोकसभेच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी वचनबद्ध आहेत. त्यामुळे कोणी भाजप वा युतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर कार्यकर्ते अशांना ओळखून असल्याने भाजप युतीचाच खासदार जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला." - आ. गीता जैन

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस