ठाणे : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा कल आता केवळ शहरी भागांपुरता मर्यादित राहिला नसून ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांना पसंती दिली जात आहे. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी सरकारी पातळीवर विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत असल्या तरी, ग्रामीण भागात याचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही. याउलट इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढत असल्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील ग्रामीण भागात वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येत देखील घट झाल्याचे दिसून येत आहे. इंग्रजी शाळेला अधिक पसंती मिळत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मातृ भाषेतून शिक्षण घेण्याचा सरकारी पातळीवर आग्रह केला जातो. यासाठी सरकारी पातळीवर विशेष योजना देखील राबवण्यात येत असतात. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी शहरी भागात इंग्रजी शाळांमध्येच आपल्या पाल्याला घालण्याचा पालकांचा मोठ्या प्रमाणात कल असतो. मात्र हा कल आता शहरी भागापुरता मर्यादित राहिला नसून ग्रामीण भागातही याचे प्रमाण वाढले असल्याचे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील घटलेल्या पटसंख्येवरून उघड झाले आहे.
गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या, खासगी शाळा वाढल्यानंतर त्याचा सरकारी शाळांना फटका बसू लागला आहे. अनेक शाळांची गुणवत्ता असूनही केवळ मराठी माध्यमामुळे या शाळांमध्ये प्रवेश कमी होत आहेत. तसेच ५० वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या संस्थांच्या अनुदानित, विशेषत: मराठी माध्यमाच्या शाळांचीही विद्यार्थी संख्या झपाट्याने घटत आहे. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाण देखील अधिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संख्या टिकवण्याचे आवाहन शाळांसमोर आहे. त्यावर उपाय म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षक विद्यार्थ्यांचा शोध घेऊन पटसंख्या वाढवण्याचे काम करत आहेत.
पटसंख्या वाढीसाठी ‘दिशा’ प्रकल्प
ठाणे जिल्ह्यातील व विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या संकल्पनेतून गेल्या काही महिन्यांपासून ‘दिशा प्रकल्प’ राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर ओळखून त्याला वैयक्तीत शिक्षण दिले, तर १०० टक्के मुलांचा विकास साधता येईल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रक्रियेतून जर विद्यार्थी सर्व स्तरापर्यंत पोहोचला तर, त्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, अशा विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष दिले जाते. मराठी, इंग्रजी किंवा गणित अशा प्रत्येक विषयाचे सहा स्तर ठरविले आहेत. अक्षर, शब्द, वाक्य, परिच्छेद, गोष्ट आणि लेखन असे स्तर आहेत. एका स्तरावरून पुढच्या स्तरावर जाण्यासाठी त्याला वैयक्तीत शिक्षण दिले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे.
यंदाच्या पटसंख्येत ५ हजाराने घट
१ ली ते ८ वी पर्यंत वर्ग
पटसंख्या २०२३-२४
७५,७८२
पट संख्या २०२४ -२५
७०,९४२