ठाणे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Aprna Gotpagar

डोंबिवली : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी शुक्रवारी (३ मे) कल्याण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे उभे आहेत. तर, ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर आणि माजी महापौर रमेश जाधव या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरला असल्याने दोघांपैकी नेमके कोण ऐनवेळी माघार घेणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. अशात बिचुकलेंनीही उडी घेत कल्याणमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे कल्याणकरांचे मनोरंजन नक्कीच होणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. शिंदेंसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे. तर, या निवडणुकीत बिचुकले उतरल्यामुळे अजून रंगत वाढणार आहे. याशिवाय, बिचुकले साताऱ्यातूनही भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत.

बिचुकले नेमके काय म्हणाले

बिचुकले म्हणाले, हा मतदारसंघ २४ कल्याण निवडण्यामागचे कारण असे आहे की, आमच्या सातऱ्याचे रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा अभिमानास्पद ज्यांचा प्रवास आहे त्यांनी काही राजकीय खेळ्या केल्या असल्या तरी, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर मी वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांचे अभिनंदन केले होते. परंतु, ते लोकांना थापा मारतात, असे मला वाटते आणि लोकांनाही ते कळाले पाहिजे. मला कोणत्याच पक्षाचे काही घेणे देणे नाही. मी अपक्ष आहे आणि संविधानाची कास धरून संपूर्ण प्रवास करतोय. ज्या वेळेला एकनाथराव त्यांचा स्वतंत्र पक्ष काढायला गेले किंवा उद्धव ठाकरेंच्या भाषेमध्ये गद्दारी जी होती ती करायला गेले तेव्हा त्यांचे विधान असे होते की, मी अजित पवारांबरोबर मांडीला मांडी लावून बसणार नाही. आज तेच अजित पवार त्यांच्या मांडीवर बसलेत, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये, असे बिचुकले म्हणाले. नवीन संसदेला मी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, असे सुचविले होते. पण, मोदी हे ऐऱ्या गैऱ्या, फालतू लोकांनाही भेटतात, त्यांच्या पाठीवर हात टाकतात. मात्र, त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब यांचे नाव संसद भवनाला द्या म्हटल्यानंतरसुद्धा त्यांनी एका शब्दाचे, एका ओळीचेही पत्र मला पाठविले नाही. म्हणजे हे लोक संविधान विरोधी आहेत का? शिवडी-न्हावाशेवा सेतू प्रकल्प झाला, त्याही वेळेला मी नागरिक आणि महाराष्ट्राच्या वतीने त्या सेतूला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या, असे म्हटले होते. त्याचाही कुठेही विचार केला नाही. अटलजींचे नाव दिले, अटलजी हे इतरांपेक्षा मला जास्त कळतात. कारण अटलजी हे कवी मनाचे होते. मी स्वत: कवी आणि गीतकार आहे. अटलजींचे व्यक्तिमत्त्व फार मोठे आहे. परंतु, राजमाता जिजाऊपेक्षा ते मुळीच मोठे नाहीत. हे मी भाजपला ठणकाऊन सांगेन, तुम्ही त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये माझ्या राजाची एक वीटही लावली नाही. तुम्ही फक्त छत्रपतींचे नाव हे स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी घेत आहात, असा आरोपही त्यांनी केला.

अपना टाईम भी आयेगा

साताऱ्याच्या मतदानाचा जो दिवस आहे. तो आपल्या कल्याणच्या प्रचाराचा पहिला दिवस आहे. त्यामुळे तिकडच्या सगळ्या सोपस्करमधून बाहेर आलो आहे. शासन आणि कायद्याने मला दोन ठिकाणी उभे राहण्याची संधी दिली आहे. तुम्हाला माहिती असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये अबू आझमी नावाचे नेते दोन ठिकाणाहून निवडून येतात आणि आता गुजरातमध्ये कोणतरी खासदार आता बिनविरोध निवडून आले. ही इतिहासातील पहिली घटना असेल, असे मला वाटते. तर, अशा काही गोष्टी होऊ शकतात. कोणीही इथे अमरपट्टा बांधून आलेले नाही आणि अमरपट्टा बांधून नसल्यामुळे अपना टाईम भी आयेगा तर, तो टाईम कल्याणकरांनी मला का देऊ नये? हा मी कल्याणकरांना प्रश्न विचारतो. हा मतदारसंघ बहुतांश बहुजन वर्गाचा आहे. इथे होतकरु, कलाकार मंडळी हे सगळे राहतात. याचा जितका विकास झाला पाहिजे होता, तितका झालाच नाही आणि अडीच वर्षात तर झालेलाच नाही. मला त्या आधीबद्दल काही बोलायचे नाही, असे बिचुकले म्हणाले.

दरम्यान, बिचुकलेंनी आतापर्यंत नगरसेवकपदापासून खासदारकीपर्यंत अनेक निवडणुका लढल्या आहेत. मात्र, एकदाही यश मिळवता आले नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस