ठाणे : पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तिकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे. आतापर्यंत, शाडूच्या मातीसाठी १० मूर्तिकारांनी तर, जागेसाठी ०५ मूर्तिकारांनी अर्ज केला आहे. मातीची उपलब्धता आणि प्रभागनिहाय जागांचे नियोजन करण्यासाठी, मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची मागणी १५ मार्चपर्यंत ठाणे महापालिकेकडे नोंदवावी. तसेच, जागेसाठीही अर्ज करावा, असे आवाहन ठाणे पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
शाडूच्या मातीच्या खरेदीसाठी ठाणे महापालिकेला मागणी नोंदवायची आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर ही माती मूर्तिकारांना उपलब्ध व्हावी, यादृष्टीने मूर्तिकारांनी मातीची मागणी १५ मार्चपर्यंत महापालिका मुख्यालय येथील पर्यावरण विभागाच्या कार्यालयात नोंदवावी, असे आवाहन पर्यावरण विभाग प्रमुख मनीषा प्रधान यांनी केले आहे. कळवा आणि वर्तकनगर प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समिती क्षेत्रातून जागा किंवा मातीसाठी अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे मूर्तिकार संघटनेनेही त्यात पुढाकार घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असेही आवाहन प्रधान यांनी केले आहे.
पर्यावरणपूरक उत्सवासाठी ठाणे पालिकेने आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तिकार तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची १६ जानेवारीला बैठक घेतली. तसेच, ०३ फेब्रुवारी रोजी पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली २०२५ ही प्रसिद्ध केली. शाडूच्या मातीसाठी ठाणे पालिका मुख्यालय येथील प्रदूषण नियंत्रण विभाग येथे, तर जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे.