छाया: विजय गोहिल
ठाणे

शहापूर तालुक्यात महिलांची पाण्यासाठी वणवण; टँकर सेवा अपुरी, पाण्यासाठी प्रचंड हालअपेष्टा

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून ढाकणे ग्रामपंचायतीच्या दोपरवाडी आणि चिंध्याचीवाडी या गावांमध्ये परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

Swapnil S

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून ढाकणे ग्रामपंचायतीच्या दोपरवाडी आणि चिंध्याचीवाडी या गावांमध्ये परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. या गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महिला, मुले आणि वृद्धांसह सर्वांना दररोज डोक्यावर तीन-तीन हंडे घेऊन एक ते दोन आणि काही ठिकाणी तीन किलोमीटरपर्यंतचा खडकाळ आणि डोंगराळ रस्ता पार करावा लागतो. इतकेच नाही तर ७ ते ८ महिन्यांच्या गर्भवती महिलांनाही पाणी मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.

शहापूर तालुक्यातील लोकसंख्येत आदिवासींचे मोठे प्रमाण आहे. कसारा, खर्डी, शिरोळ, अजनुप तसेच आदिवासी पाडे जसे की दांड, उंबवणे, वाशाळा, रुईची, बिबलवाडी, खड्याचा पाडा, कलशेत परांड, नारळवाडी ही गावे डोंगराळ आणि दुर्गम भागात वसलेली आहेत. अशा भागांमध्ये टँकरने पाणी पोहचविणे कठीण असल्यामुळे पाण्यासाठीची धडपड अधिकच वाढली आहे.

या भीषण परिस्थितीमुळे शहापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधारी आमदार आणि स्थानिक प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. “शहापूर तालुक्यातून मुंबईसारख्या महानगराला लाखो लिटर पाणी पुरवले जाते, मात्र येथील लोकांना एक हंडा पाण्यासाठी देखील जीव धोक्यात घालावा लागतो,” अशी टीका स्थानिकांनी केली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे. काही ठिकाणी नवीन बोअरवेल आणि विहिरी खोदण्याची कामे सुरू असून, दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. शहापूरचा पाण्यासाठीचा संघर्ष आजही कायम आहे. एकीकडे लाखो लिटर पाणी मुंबईला जात असताना, दुसरीकडे त्याच शहापूरमधील गावकरी डोक्यावर हंडे घेऊन डोंगराळ रस्त्यांवरून पाण्यासाठी वणवण फिरत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.

एक हंडा पाण्यासाठी जीव धोक्यात

सध्या जिल्हा परिषद शहापूरजवळील भातसा नदीतून तालुक्यातील सुमारे ९६ गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवते. मात्र, ही टँकर सेवाही अपुरी पडते आहे. टँकरमधून आलेले पाणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरींमध्ये सोडले जाते. या विहिरी डोंगराच्या उंचावर राहणाऱ्या गावांपासून खूप दूर असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी उतरती-चढती वाट पार करत खडतर प्रवास करावा लागतो. परिणामी थकवा, दुखापती आणि आजारपणाची समस्या वाढत आहे.

वाड्यात पाणीटंचाई तीव्र

वाडा : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात गावागावात भीषण पाणीटंचाईचे चित्र पहावयास मिळत आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. तरुणांपासून वृद्धापर्यंत सर्वानाच या टंचाईच्या झळा पोहचू लागल्या आहेत. कुठे विहिरींनी तळ गाठला तर कुठे पाणी योजना बंद पडल्या आहेत. कुटुंबासाठी लहान मुले सुद्धा पाणी आणण्यासाठी रखरखत्या उन्हात वणवण भटकत आहेत. तसेच वाडा तालुक्यातील परळी, उज्जेनी परिसर याभागात ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.

मुंबई उपनगराच्या शेजारीच असलेल्या पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ भाग असलेला विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यातील बहुतांश भागातील आदिवासी नागरिक अजूनही जीवनातील मूलभूत गरजापासून वंचित असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सरकारच्या मोठमोठ्या योजना व घोषणा करोडोंचा निधी कागदावरच अस्तित्वात असून योग्य अंमलबजावणी व व्यवस्थापना अभावी सर्व पाण्यात गेल्याची स्थित आज आहे. उन्हाचा पारा चढत असल्याने अनेक भागातील विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने महिलांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे.

पाण्यासाठी महिलांची दमछाक

विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील म्हसेपाडा, घोडीचापडा या गावात भीषण पाणीटंचाई आहे. म्हसेपाड्यातील महिलांना गावापासून दूर टेकड्यांवरून पाणी आणतांना महिलांची दमछाक होते. तसेच साखरे कासपाड्यातील आदिवासी महिलांना पाण्याच्या शोधात नदी, नाल्यांच्या पात्रात खड्डे खणत वणवण फिरावे लागत असल्याचे विदारक चित्र दरवर्षी पहावयास मिळत आहे. कासपाड्याच्या महिलांना पाण्यासाठी नदीपात्रा खालील २ किलोमीटर लांब असलेल्या डोंगर, दऱ्या उतरून कोम पाड्याच्या विहिरीवर पाणी मिळवण्यासाठी जावे लागत आहे. प्रशासनाने पाणीटंचाईवर तातडीने निर्णय घेऊन समस्या सोडवावी, अशी अपेक्षा स्थानिक करीत आहेत.

Sydney Mass Shooting: सिडनीतील बॉन्डी बीचवर भीषण गोळीबार; १० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

अमेरिकेच्या रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठात गोळीबार; २ जणांचा मृत्यू, संशयिताचा शोध सुरू

अजित पवारांनी हेडगेवार स्मृतीस्थळाची भेट टाळली, आनंद परांजपेंचे स्पष्टीकरण; म्हणाले...

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; नवी मुंबईतील १७ हजार घरांची लॉटरी लवकरच

BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीची उद्या घोषणा?