डोंबिवली : 'त्या' ६५ अनधिकृत इमारतींवर कारवाईची टांगती तलवार लटकत असताना त्यातील रहिवाशांच्या मदतीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) या दोन पक्षाने पुढाकार घेतला आहे. शनिवारी दि. २२ रोजी डोंबिवली पूर्वेकडील हेरिटेज सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेने रहिवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता तज्ज्ञ मंडळींची बैठक घेण्यात आली. त्या इमारतीतील रहिवाशांना न्याय देण्यासाठी सोमवारी दि. २४ रोजी गणेश नाईक यांच्या जनता दरबारात दाद मागण्यात येणार आहे. त्याचबरोबर ठाकरे पक्षामार्फत पालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच याप्रकरणी न्यायालयात स्थगिती (स्टे) घेण्याकरिता जाणार असल्याचे देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
या बैठकीत इमारतीतील अनेक रहिवासी बैठकीत हजर होते. मार्गदर्शन करताना सुरुवातीला वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सदर इमारतीच्या बाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. यात कोण दोषी आहेत? कक्षा पद्धतीने विकासकाने रहिवाशांची फसवणूक केली, यावर माहिती दिली. पुढे वकिलांनी कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकत रहिवाशांनी न्यायालयात आपली बाजू मांडून आपली फसवणूक कशी झाली असे सांगणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच कायदेशीर लढत महत्त्वाची असल्याचे देखील सांगण्यात आले.
याप्रकरणी कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले की, 'त्या' ६५ इमारतीतील रहिवाशांसह ठाकरेंची शिवसेना पालिका मुख्याल्यावर भव्य मोर्चा काढणार आहे. तसेच २४ तारखेला ठाण्यातील गणेश नाईक यांच्या जनता दरबारात सहभागी होऊन 'त्या' रहिवाशांच्या अडचणी दूर करण्याची मागणी करण्यात येणार आहे. रहिवाशांनी आपली फसवणूक झाल्याबद्दल विकासकावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा, ज्यांनी ज्यांनी रहिवाशांची फसवणूक केली त्यांच्याविरोधात डोंबिवलीतील चारही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याकरिता अर्ज केले जाणार आहे. पालिका मुख्यालयात काढण्यात येणारा मोर्चा शांततेने काढण्यात येईल व या मोर्च्यात कोणत्याही पक्षाचे फलक हाती घेतले जाणार नसल्याचे देखील दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, वास्तुविशारद संदीप पाटील, राष्ट्रवादीचे भाऊ पाटील, काँम्रेड काळू कोमास्कर, तीन वकील आदींनी मार्गदर्शन केले.
पोलिसांनी दखल घेणे आवश्यक
एकदा फसवणूक झाल्यानंतर पुन्हा रहिवाशांची फसवणूक होत असून विकासक प्रत्येक इमारतीमागे अडीच लाख रुपये प्रमाणे दीड कोटी रुपये घेत असल्याचा गौप्यस्फोट या बैठकीत जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला. पोलिसांनी याची दखल घेणे आवश्यक असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले.
दिव्यातील कारवाईला नागरिकांचा विरोध
डोंबिवलीतील ६५ इमारतींचा विषय चर्चेत असतानाही आता न्यायालयाच्या निर्देशानंतर दिव्यातील ५४ बेकायदा इमारतींवर कारवाई होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी या कारवाईविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी इमारतीवर प्रतीकात्मक फाशीचा दोर लावून प्रशासनाच्या कारवाईचा विरोध केला. आम्हाला बेघर केले तर आत्मदहन करण्याशिवाय आम्हाला पर्याय नसल्याचा इशारा इमारतींमध्ये राहणाऱ्या महिलांनी दिला. तर लाडक्या बहिणींना बेघर करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करत असल्याचेही या महिलांनी सांगितले.
या आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. दिवा परिसरात २०१७ ते २०२१ या काळात उभारण्यात आलेल्या इमारतींविरोधात एका नागरिकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. यात २०१७ ते २०२१ या काळात उभारण्यात आलेल्या ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले.