प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

Thane : स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये मोठी चुरस; दोन जागांसाठी तब्बल ४० इच्छुक

महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू असतानाच आता ठाणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी अनेक जण अक्षरशः देव पाण्यात टाकून बसले असून, विशेषतः भाजपमध्ये या पदांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

Swapnil S

ठाणे : महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू असतानाच आता ठाणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी अनेक जण अक्षरशः देव पाण्यात टाकून बसले असून, विशेषतः भाजपमध्ये या पदांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला २८ जागा मिळाल्या असून, त्या आधारे पक्षाच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवक पदे आली आहेत. मात्र या केवळ दोन जागांसाठी भाजपच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांकडे तब्बल ४० जणांनी अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे, इच्छुकांनी केवळ अर्जच नव्हे तर पक्षनिष्ठा कशी जपली, प्रभागात कोणती कामे केली याचे सविस्तर सादरीकरणही केले आहे.दुसरीकडे भाजपच्या वाट्याला आलेल्या दोन स्वीकृत नगरसेवक पदांसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान शिंदे सेनेसोबत युती झाल्याने भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती, मात्र त्यातील एकही उमेदवार निवडून आलेला नाही. तरीही काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी टाळत युतीचे काम प्रामाणिकपणे केले होते.

याच पार्श्वभूमीवर महापालिकेत स्थान मिळावे, या उद्देशाने अनेकांनी फिल्डिंग लावली असून, एका आमदाराच्या कार्यालयात तब्बल ४० जणांनी आपले बायोडेटा सादर केल्याची माहिती आहे. सोबतच त्यांनी केलेल्या सामाजिक, संघटनात्मक आणि निवडणूक काळातील कामांचा तपशील प्रिंट स्वरूपात दिला आहे. केवळ दोन जागांसाठी ४० जण इच्छुक असताना, भाजपमध्ये ‘स्वीकृतचे श्रीखंड’ कोणाच्या वाट्याला येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून, अंतिम निर्णय लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संख्याबळाचे गणित

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे ७५ नगरसेवक निवडून आले असून, त्यांच्या वाट्याला ६ स्वीकृत नगरसेवक पदे आली आहेत. भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे १२, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय एमआयएमचे ५ आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. या संख्याबळामुळे महापौरपद शिंदेसेनेकडे जाणे निश्चित मानले जात आहे.

शिंदेसेनेतही मोठी स्पर्धा

शिंदेसेनेतील सहा स्वीकृत नगरसेवक पदांसाठीही मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. राजेंद्र साप्ते, अशोक वैती, सचिन भोसले, आशुतोष म्हस्के, अमित जयस्वाल यांच्यासह ५० हून अधिक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या सहा जागांसाठी कोणाची वर्णी लागते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणावर विश्वास दाखवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुकांनी आतापासूनच वरिष्ठांच्या भेटीगाठी आणि हालचाली वाढवल्या असल्याचे चित्र आहे.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी