ठाणे

ओसी नसलेल्या इमारतीत पालिकेचे प्रभाग कार्यालय; मागील १४ वर्षांपासून इमारतीचा व्यावसायिक वापर

इमारतीला ओसी (ओक्युपेशन सर्टिफिकेट) नसताना देखील ठाणे महापालिका मागील १४ वर्षांपासून इमारतीचा व्यावसायिक वापर करीत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

Swapnil S

ठाणे : इमारतीला ओसी (ओक्युपेशन सर्टिफिकेट) नसताना देखील ठाणे महापालिका मागील १४ वर्षांपासून इमारतीचा व्यावसायिक वापर करीत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या इमारतीमध्ये भाजी मंडई, व्यावसायिक गाळे व ठाणे महानगरपालिकेचे प्रभाग समिती कार्यालय तसेच दुय्यम निबंधक कार्यालय व इतर कार्यालये मनमुक्तपणे सुरू असल्याचे ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी उघडकीस आणले. ओसी नसतानाही एखाद्या इमारतीचा पालिका प्रशासन वापर करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेच्या या मनमानी कारभाराविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित करत या सर्व प्रकरणाची चौकशी करून जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत केलेली आहे.

ठाणे नौपाडा परिसरात गावदेवी मार्केट (गावदेवी भाजी मंडई) ही व्यावसायिक इमारत ठाणे महानगरपालिकेकडून २०१४ साली बांधण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या इमारतीच्या बेसमेंटला दुचाकी वाहनांची पार्किंग तळमजल्यावर भाजी मंडईसह (भाजीपाला दुकाने) इतर व्यावसायिक गाळे व वरील मजल्यावर ठाणे महानगरपालिकेचे नौपाडा कोपरी प्रभाग समिती कार्यालय, तसेच दुय्यम निबंधक कार्यालय व इतर कार्यालये असल्याने दररोज हजारो लोकांची येजा या ठिकाणी असते. परंतु या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र अर्थात ओसीच (ओक्युपेशन सर्टिफिकेट) नाही. ओसी असल्याशिवाय बिल्डर वा मालक कुणालाही इमारतीचा-घराचा ताबा देऊ शकत नाही, असे झाल्यास हा गुन्हा मानला जातो, असे असतानाही ठाणे महापालिका स्वतःच्या मालकीच्या ओसी नसलेल्या इमारतीचा व्यावसायिक वापर मागील दहा वर्षापासून सर्रासपणे करत आहे.

या इमारतीतील तळ मजल्यावरील गाळे पुनर्वसन स्वरूपात भाजी मंडईसाठी दिलेले आहेत. परंतु भाजीविक्री न करता मोठ्या प्रमाणात येथील गाळ्यांच्या वापर कपड्यांच्या दुकानांसाठी केला जात आहे. तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात कपड्याची दुकाने असल्याने आग लागल्यास मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम शहर विकास विभागाची पूर्वपरवानगी न घेता स्थावर मालमत्ता विभागाने पुनर्वसन स्वरूपात दिले असल्यास एक प्रकारे गाळेधारकांची देखील केलेली फसवणूक आहे.

त्यामुळे या पद्धतीने महानगरपालिकाच आत बाहेर येण्याच्या जिन्याच्या मार्गात अनधिकृत बांधकाम करून पुनर्वसन कसे काय करू शकते? असा सवाल ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी उपस्थित करत या सर्व प्रकरणाची चौकशी करून जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत केलेली आहे.

दहा वर्षांत अग्निशमन व प्रतिबंधात्मक अहवाल नाही

नियमाप्रमाणे ओसी असल्याशिवाय कोणालाही फायर एनओसी देता येत नाही. परंतु या इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर प्राथमिक फायर एनओसी देताना अग्निशमन विभागाकडून अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार या इमारतीस स्वतंत्र नियंत्रण कक्ष पुरवणे बंधनकारक असल्याचे तसेच स्थायी अग्निशमन व प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित असल्याबाबतचा अहवाल वर्षातून दोनदा अग्निशमन विभागास सादर करणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. परंतु मागील दहा वर्षांत असा कुठल्याही प्रकारचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही व सद्यस्थितीत या इमारतीची अग्निशमन यंत्रणाच योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video