ठाण्यात छठपूजेच्या उत्सवाला गालबोट; २० वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
ठाणे

ठाण्यात छठपूजेच्या उत्सवाला गालबोट; २० वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

तरुणाचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांनी विशेष उपकरणांचा वापर केला. पाण्याखाली शोध घेण्यासाठी टेलिस्कोपिक कॅमेऱ्याचीही मदत घेण्यात आली.

किशोरी घायवट-उबाळे

ठाणे : छठपूजेच्या विधीदरम्यान कळवा येथील तलावात बुडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १६) सकाळी घडली. धार्मिक विधीसाठी तलावात उतरलेल्या या तरुणाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधमोहीम सुरू केली. सुमारे ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.

माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव प्रदीप गुलाब विश्वकर्मा (वय २०) असे असून तो कळवा येथील भास्कर नगरमधील यादव चाळीत राहत होता. सोमवारी सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास कळवा पूर्वेकडील मफतलाल कंपाऊंड परिसरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या तलावात ही दुर्घटना घडली. छठपूजेच्या विधीसाठी प्रदीप पाण्यात उतरला होता. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

४५ मिनिटांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह हाती

घटनेची माहिती मिळताच कळवा पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारीही आवश्यक साहित्य आणि शववाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. तरुणाचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांनी विशेष उपकरणांचा वापर केला. पाण्याखाली शोध घेण्यासाठी टेलिस्कोपिक कॅमेऱ्याचीही मदत घेण्यात आली.

सुमारे ४५ मिनिटे शोधमोहीम राबवल्यानंतर सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास प्रदीपचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यानंतर मृतदेह कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले

पोलिसांनी मृतदेह महापालिकेच्या शववाहिकेतून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला. तेथे शवविच्छेदन आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, धार्मिक कार्यक्रमांसाठी तलाव किंवा अन्य जलाशयांमध्ये उतरताना नागरिकांनी पाण्याच्या खोलीचा अंदाज घेऊन खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Raigad Fire : उरणमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग! मोठ्या स्फोटाने परिसर हादरला; धुराचे लोट हवेत, VIDEO

RBI च्या कडक नियमामुळे आता डिजिटल फसवणूकीला आळा; सर्वसमावेशक नियमावली अखेर जाहीर

ठाण्यात तीन ठिकाणी नवीन पादचारी पूल; वर्तकनगरची वाहतूककोंडी फुटणार

छठपूजेचा प्रसाद खाल्ल्याने आईचा संताप अनावर; चार वर्षांच्या चिमुरडीला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

एअर प्युरिफायरच्या विक्रीत वाढ; पारंपरिक बाजारपेठेत मागणी वाढली; प्रदुषण वाढल्याने दिवाळीनंतर खरेदीत तेजी