'बिनविरोध'साठी कपटनीती; पोलिसानेच उमेदवाराला नेले शिंदेंच्या बंगल्यात; ठाकरे सेनेचे विचारे, मनसेचे जाधव यांचा आरोप 
ठाणे

'बिनविरोध'साठी कपटनीती; पोलिसानेच उमेदवाराला नेले शिंदेंच्या बंगल्यात; ठाकरे सेनेचे विचारे, मनसेचे जाधव यांचा आरोप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या ६ साथीदारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणांसह पोलिसांचाही सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी दुपारी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.

Swapnil S

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या ६ साथीदारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणांसह पोलिसांचाही सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी दुपारी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.

अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी एक पोलीस अधिकारी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवाराला शिंदेच्या ‘शुभदीप’ बंगल्यावर नेत असल्याचे चित्रीकरणच यावेळी अविनाश जाधव यांनी माध्यमांसमोर सादर केले. दरम्यान, प्रतिस्पर्धी उमेदवारांना बंगल्यावर बोलावून आमिष दाखवणे तसेच, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी यावेळी शिवसेना आणि मनसेने केली.

गद्दारांना क्षमा नाही...

पालिका निवडणुकीत शिवसेना, मनसे पक्षाचे तिकीट घेऊन उमेदवारी मागे घेणाऱ्या गद्दारांना क्षमा नाही. पक्षाला कोणतीही पूर्वसूचना न देता माघार घेणारे सध्या गायब आहेत. निवडणुका संपताच ज्यांनी-ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांचा पाहुणचार आम्ही घेणारच, असा इशारा त्यांनी दिला.

ठाण्यात शिंदेंच्या सहा साथीदारांपैकी तीन जण वृषाली पाटील या निवडणूक अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील केंद्रात बिनविरोध करण्यात आले. तर, सत्वशिला शिंदे ह्या निवडणूक अधिकाऱ्यानेही हाच कित्ता गिरवल्याचा आरोप करीत अविनाश जाधव यांनी दोन दिवसात हे दोन्ही निवडणूक अधिकारी बदलून नवीन अधिकारी नेमावेत, अन्यथा निवडणूक कार्यालयावर मनसे स्टाईल धडक देणार असल्याचा इशारा दिला.

यंत्रणेचा गैरवापर करून अर्ज बाद केल्याचा आरोप

ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेसह विरोधी पक्षातील उमेदवारांचे अर्ज सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून पैशांचे आमिष दाखवून कपटनीतीने बाद करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ६ साथीदारांना बिनविरोध निवडून आणण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. यासंदर्भातील माहिती देताना राजन विचारे यांनी सांगितले की, या निवडणुकीत राज्यभरात ३३६ अर्ज अधिकाऱ्यांनी बाद केले असून तब्बल ६८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बंगल्यावर बोलावून आमिष देत शिंदेंचे साथीदार बिनविरोध निवडण्याचे अर्धेअधिक काम निवडणूक अधिकाऱ्यांनीच केले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील आणि सत्वशिला शिंदे यांच्या मोबाईलची तपासणी व्हायला हवी, अशी मागणी विचारे यांनी केली.

बिनविरोध उमेदवार करा बाद - विचारे

‘मनी’ आणि ‘मसल’चा वापर करून निवडणूक बिनविरोध करणे हा प्रकार इतिहासात पहिल्यांदाच घडला असून सत्ताधाऱ्यांनी हा नवा फंडा सुरू केला आहे. तेव्हा, हे बिनविरोध उमेदवार बाद करण्याची आग्रही मागणी विचारे यांनी केली. ठाणे महापालिका यांनी लुटून खाल्ली हे सत्ताधारी भाजपच्या आमदारानेच विधिमंडळात सांगितल्याची आठवण करून देत आता ड्रग्ज‌्च्या माध्यमातूनही माया गोळा केली असून ह्या ड्रग्जचा केंद्रबिंदू साताऱ्यात आणि ठाण्यात असल्याचे विचारे यांनी सांगितले.

अपक्षांनी माघार घेण्यामागे आर्थिक उलाढाली...

अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी उबाठा सेनेचे उमेदवार विक्रांत घाग याला एका पोलीस अधिकाऱ्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘शुभदीप’ बंगल्यावर नेत असतानाचे चित्रीकरण मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. अनेक अपक्षांनी माघार घेण्यात झालेल्या आर्थिक उलाढालीतील पैसा साताऱ्याच्या त्या ड्रग्ज प्रकरणातून आल्याचा आरोप त्यांनी केला.

काढलं नाही, मीच निघाले! बांगलादेश प्रीमियर लीगमधून बाहेर पडल्यावर रिद्धिमा पाठकचा खुलासा, म्हणाली - ‘माझ्यासाठी देश सर्वप्रथम’

भाजप-काँग्रेस युतीवर देवेंद्र फडणवीसांचा नाराजीचा सूर; म्हणाले, "असे काही घडले असेल तर...

"वाटलेल्या नोटांमुळे 'नोटा'चाही अधिकार गेला" ; राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर व्हिडिओ लाँच

छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा; निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

'अपघात व्हायची वाट पाहताय का?' अंधेरी स्थानकावर प्रचंड गर्दी; महिनाभराच्या WR ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, Video व्हायरल