ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा खाडीकिनारी साफसफाई सुरू असताना कर्मचाऱ्यांना एका पिशवीत मतदार ओळखपत्रे व पॅनकार्ड सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील यांनी गणेशघाट परिसरात धाव घेतली. त्यांनी कागदपत्रांचे फोटो-व्हिडीओ काढले आणि काही मतदान ओळखपत्रांवरील पत्त्यांची चौकशी केली असता, तेथे कोणीही वास्तव्यास नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही ओळखपत्रे बोगस असल्याचे उघड झाले.
ठाणे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ही कार्डे १४९ विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी संदीप थोरात यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी प्रखर संताप व्यक्त करत निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.
खा. राहुल गांधी गेली अनेक वर्षे वोट चोरीसाठी बोगस मतदार नोंदणी होत असल्याचे पुराव्यासकट सांगत आहेत. मात्र निवडणूक आयोग सतत डोळेझाक करून सरकारला पाठीशी घालत आहे. ठाण्यात घडलेली ही घटना त्याचे ठोस पुरावे देणारी आहे, असे पिंगळे म्हणाले. ते पुढे म्हणाले, ही बोगस ओळखपत्रे नेमकी कशी तयार झाली? त्यासाठी कोणते आधारकार्ड, रहिवाशी दाखले व मोबाईल क्रमांक सादर करण्यात आले? नोंदणी कोणत्या सायबर कॅफे किंवा आधारसेतूमार्फत झाली? याचा उपयोग कोणत्या निवडणुकांमध्ये झाला? या सर्व बाबींचा सखोल तपास झाला पाहिजे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीवर थेट आघात असून, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा लोकशाही केवळ नावापुरती राहील. या शिष्टमंडळात निलेश पाटील, मोतीराम भगत, वसीम सय्यद, यासीन मोमिन, रवींद्र कोळी, नूर्शिद शेख, हमीद शेख, रमेश सोनवणे, रोशन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याची मागणी केली आहे.
अपार्टमेंट, मंदारमाला अभय नगर झोपडपटी, कळवा या पत्त्यावर परब नावाचे गृहस्थ मागील २० वर्षापासून राहत आहेत. मात्र सापडलेल्या कार्डावरील पत्ता हाच असल्याचे दिसते. त्यामुळे सर्व कार्डाच सत्य व्हेरिफिकेशन होणे अत्यावश्यक आहे. जमा करण्यात आलेली बहुतेक ओळखपत्रे २०१५ सालातील असून, काही २०१४, २०१६ व २०१७ सालातील आहेत. हा घोटाळा केवळ मतदार नोंदणीपुरता मर्यादित नसून, लोकशाही व्यवस्था धोक्यात आणणारा कट आहे.
- राहुल पिंगळे (प्रवक्ते काँग्रेस ठाणे)