ठाणे : ठाणे शहरातील उड्डाणपुलांवर पावसाळ्यात टाकण्यात आलेले मास्टिक आता वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. खड्डे बुजविण्यासाठी करण्यात आलेल्या या तात्पुरत्या उपाययोजनेमुळे रस्ते व पुलांवर फुगवटे निर्माण झाले असून, यामुळे वाहनांचे संतुलन बिघडल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे आहे.
घोडबंदर मार्ग हा ठाण्यातील प्रमुख वाहतुकीचा दुवा असून, वसई आणि गुजरात दिशेने जाणाऱ्या वाहनांचा ताण येथे नेहमीच असतो. मेट्रो व रस्ते जोडणीच्या कामांमुळे आधीच वाहतूककोंडी होत असताना, आता उड्डाणपुलांवरील फुगवट्यांनी वाहनचालकांचे हाल अधिकच वाढवले आहेत. तीनहात नाका, कॅडबरी, माजिवडा, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ परिसरातील उड्डाणपुलांवर मोठ्या प्रमाणात फुगवटे तयार झाले आहेत. काही ठिकाणी दुचाकी व रिक्षाचालकांना या फुगवट्यांमधून मार्ग काढताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.
पावसाळ्यात एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी मास्टिक पद्धतीचा वापर केला होता. मात्र आता हेच मास्टिक महापालिकेची डोकेदुखी ठरत आहे.
फुगवटे लेव्हल अप करण्याचे काम हाती घेणार
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फुगवटे काढून टाकण्याची योजना आखण्यात येत आहे. माजिवडा व घोडबंदर दिशेकडील पुलांवर वाहतुकीचा ताण वाढल्याने, मुंब्रा बायपासप्रमाणे या उड्डाणपुलांचे कॉंक्रीटीकरण करण्याची तयारी सुरू आहे. लवकरच फुगवटे लेव्हल अप करण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.