मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाने हजेरी लावली. ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडला. शहापूरमध्ये वीज कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला.
मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यानच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत पावसासाठी पुन्हा एकदा अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
भारतीय हवामान विभागाच्या सॅटेलाईट प्रणालीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. २१ सप्टेंबर रोजी या प्रणालीचे रूपांतर 'अवदाबात' आणि २२ सप्टेंबरपर्यंत 'तीव्र अवदाबात' होण्याचा अंदाज आहे. २३ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ही प्रणाली दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या हवामान बदलाचा थेट प्रभाव महाराष्ट्रातील हवामानावरही दिसून येत असून राज्यातील पाऊस पुन्हा ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे.
रूपांतर चक्रीवादळात
२३ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर काहीसा ओसरेल; मात्र दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता कायम राहील, तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान मुख्यत्वे कोरडे किंवा ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. 'लो प्रेशर', 'डिप्रेशन' आणि 'डीप डिप्रेशन' म्हणजे काय हवामान विभागाने समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या तीव्रतेनुसार पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे त्यानुसार कमी दाबाचे क्षेत्र ही हवामान बदलाची पहिली पायरी असते. यामध्ये वाऱ्याचा वेग ३१ किमी/तास पेक्षा कमी असतो. आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम पाऊस पडतो. कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यास त्याचे रूपांतर 'अवदाबात' होते. यात वाऱ्याचा वेग ३२ ते ४९ किमी/तास असतो. यामुळे अनेक भागांत जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस होतो. तीव्र अवदाब हा अवदाबाचा अधिक आक्रमक टप्पा असून वाऱ्याचा वेग ५० ते ६१ किमी/तास असतो. यामध्ये विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडतो आणि समुद्रात प्रचंड लाटा उसळतात. याची तीव्रता अधिक वाढल्यास त्याचे रुपांतर चक्रीवादळात होते.
पुढील ३ दिवस यलो अलर्ट
२१ सप्टेंबरला विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, नाशिक (घाटाचा भाग), अहिल्यानगर, पुणे (घाटाचा भाग), सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि लातूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.