ठाणे : रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर आणि टुरिस्ट वाहनचालकांना मराठी येते का, याची तपासणी करण्याची मोहीम ठाण्यात परिवहन विभागाने सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल १,१८३ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसलेल्या ८९ चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या मराठी ज्ञानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर तसेच टुरिस्ट वाहनचालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. परराज्यातून रोजगारासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या चालकांना मराठी शिकता यावी, यासाठी यापूर्वी मराठी भाषा शिकविण्याचे वर्गही आयोजित करण्यात आले होते. ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी ५००, दुसऱ्या दिवशी ३५५, तर तिसऱ्या दिवशी ३२८ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अनुक्रमे ३१, ३६ आणि २२ चालकांना नोटिसा देण्यात आल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी ही माहिती दिली.
प्रवाशांशी संवाद सुलभ होणार
रिक्षा-टॅक्सीचालकांचा दररोज हजारो प्रवाशांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे प्रवाशांशी स्थानिक भाषेत संवाद साधता येणे ही प्रवासी सेवा अधिक सुलभ आणि विश्वासपूर्ण करण्यासाठी महत्त्वाची बाब आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचे ज्ञान उपयुक्त ठरते.
‘नियम’ म्हणून नव्हे, महाराष्ट्राशी जोडणारा दुवा
परराज्यातून रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या चालकांनी मराठी शिकण्याकडे केवळ नियम म्हणून न पाहता महाराष्ट्राच्या समाजजीवनाशी जोडणारे माध्यम म्हणून पाहावे. मराठी आल्याने प्रवाशांशी संवाद साधणे अधिक सोपे होईल, असे मत प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी व्यक्त केले.