फरियाल सैय्यद/ ठाणे :
ठाणे शहरातील १२४ वर्षे जुन्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या सर्वांगीण आधुनिकीकरणाची कामे सुरू झाली आहेत. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर या रुग्णालयाच्या आधुनिक रचनेत रूपांतरित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ४० ते ४५ जुन्या इमारती पाडण्याचा प्रस्ताव आहे, ज्यापैकी २५ नवीन इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. पाडलेल्या इमारतींत पुरुष रुग्णांचे वॉर्ड तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांची सरकारी निवासस्थाने यांचा समावेश आहे. मात्र, रुग्ण व कर्मचारी यांना तात्पुरते हलविण्यासाठी जागेअभावी पाडकाम थांबले आहे. नवीन पायाभूत सुविधा १,१२,७४५ चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारल्या जाणार असून सुमारे ३१ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ हिरवळीसाठी राखीव ठेवले जाणार आहे.
दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार
पर्यावरण मंजुरी, प्री-कन्स्ट्रक्शन परवाने आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे मिळताच पुढील बांधकामाचा टप्पा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नियुक्त आर्किटेक्ट सध्या तांत्रिक नियोजनाची अंतिम पाहणी करत आहेत. ९ फेब्रुवारीपूर्वी भूमिपूजन समारंभ आयोजित केला जाईल, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील पहिले ‘आधुनिक मानसोपचार रुग्णालय’
ठाण्यातील हे रुग्णालय महाराष्ट्रातील पहिले ‘आधुनिक मानसोपचार रुग्णालय’ ठरणार आहे. याचे बांधकाम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्सेसच्या धर्तीवर केले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
कुटुंबीयांसाठी विशेष सुविधा
रुग्णांच्या उपचाराच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, हे नेहमी दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सोयींना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. रुग्णालयात फॅमिली रूम्स तयार करण्यात येणार असून गरज भासल्यास नातेवाईकांना रुग्णांसोबत राहता येणार आहे. याशिवाय ‘हाफवे होम’ प्रणाली असेल, जिथे बरे होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या रुग्णांना स्वयंपूर्णता, दैनंदिन दिनक्रम आणि सामाजिक समन्वयाचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच डि-ॲडिक्शन सेंटर, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग, मुलांसाठी चाइल्ड-सायकियाट्री युनिट, अत्याधुनिक किचन आणि २४x७ कॅन्टीनचाही समावेश आराखड्यात आहे.
झाडे तोडण्यावरून प्रकल्पाला विरोध
या रुग्णालयाच्या उभारणीसाठी सुमारे ७४० झाडे तोडण्याच्या योजनेला विरोध सुरू आहे. पर्यावरणीय स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक राजकारणी यांनी राज्य सरकारने ही झाडे रुग्णालय परिसरातच स्थलांतरित करण्याचा आराखडा सादर करावा, तसेच स्थलांतरणानंतर त्यांचे जगणे सुनिश्चित करणारी योजना सादर करावी, अशी मागणी केली आहे.
न्युरोसर्जरी विभाग स्थापन होणार
सध्याच्या १,८५० खाटांच्या तुलनेत रुग्णालयाची क्षमता वाढवून ३,२७८ खाटांची केली जाणार आहे. तसेच राज्यात पहिल्यांदाच येथे न्युरोसर्जरी विभाग स्थापन होणार आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांत पाठवावे लागणार नाही.