प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला वेग; १३२ इमारतींचे नकाशे मागवले

ठाणे शहरातील अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे. २९ किमी लांबीच्या या मेट्रो प्रकल्पातील तब्बल ३ किमी मार्ग हा भूमिगत असणार आहे. या भूमिगत मार्गावरील १३२ इमारतींचे बांधकाम नकाशे तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी महामेट्रोकडून ठाणे महापालिकेकडे करण्यात आली आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे. २९ किमी लांबीच्या या मेट्रो प्रकल्पातील तब्बल ३ किमी मार्ग हा भूमिगत असणार आहे. या भूमिगत मार्गावरील १३२ इमारतींचे बांधकाम नकाशे तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी महामेट्रोकडून ठाणे महापालिकेकडे करण्यात आली आहे.

मेट्रोचे बोगदे आणि स्थानके जमिनीखाली असल्याने परिसरातील इमारतींच्या पायाभूत रचनेचा अभ्यास आवश्यक आहे. शहर विकास विभागाचे अधिकारी देवेंद्र नेर यांनी सांगितले की, या इमारतींचे स्ट्रक्चरल नकाशे महापालिकेकडून उपलब्ध करून दिले जातील. लवकरच

दररोज ७.६१ लाख प्रवासी या मेट्रोतून प्रवास करतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) मार्फत राबवला जात असून १२,२०० कोटींचा हा प्रकल्प केंद्र सरकारने ऑगस्ट २०२४ मध्ये मंजूर केला आहे.

तीनऐवजी सहा डब्यांची मेट्रो

केंद्र सरकारकडून सुरुवातीला तीन डब्यांच्या मेट्रोचा प्रस्ताव होता. मात्र, ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा डब्यांची मेट्रो आवश्यक असल्याचे मत मांडले आणि अखेर केंद्राने हा प्रस्ताव मान्य केला आहे.

डोंगरीपाडा ते बाळकुम मार्गापासून सुरुवात

महा मेट्रोनुसार, ठाणे मेट्रो हा पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतूक पर्याय ठरणार आहे. यामुळे वाहतूककोंडी कमी होईल, इंधन बचत होईल आणि प्रदूषणात घट होईल, असा दावा करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी निधी केंद्र व राज्य सरकारांसह द्विपक्षीय वित्तीय संस्थांकडून मिळणार असून, स्थानकांच्या नामकरण हक्कांद्वारे व मालमत्तेच्या मुद्रीकरणाद्वारेही निधी उभारणी होणार आहे. अंतर्गत मेट्रोच्या कामाला डोंगरीपाडा ते बाळकुम या मार्गावर सुरुवात होणार आहे. या कामाची प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून, नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. ठाणे स्टेशन ते नवीन ठाणे रेल्वे स्थानक (मनोरुग्णालयाजवळील) या भूमिगत मार्गाच्या सुमारे दीड किमी परिसरात १३२ इमारती आहेत. या इमारतींच्या खालून मेट्रोचा बोगदा जाणार असल्याने त्यांच्या पायाभूत रचनेची माहिती आता महा मेट्रोने मागवली आहे.

२९ किमी लांबीच्या रिंग मार्गात २२ स्थानके

या मेट्रो मार्गाची एकूण लांबी २९ किमी असून, त्यापैकी २६ किमी उन्नत आणि ३ किमी भूमिगत असेल. या मार्गावर एकूण २२ स्थानके असतील, त्यापैकी दोन स्थानके भूमिगत असतील. यातील एक स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाशी थेट जोडले जाणार आहे.

प्रमुख स्थानके

रायला देवी, वागळे सर्कल, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाजी नगर, नीलकंठ टर्मिनल, गांधी नगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, पातलीपाडा, आझाद नगर, मनोरमा नगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुमपाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे अशी स्थानके असतील.

पावसाचा आणखी आठवडाभर मुक्काम; भारतीय हवामान खात्याचा अंदाज

नागपूर येथील विधान भवन, रवि भवनचे काम रखडले; थकीत रकमेमुळे कंत्राटदारांचा कामावर बहिष्कार

आठ महिन्यांच्या गरोदर तलाठीची शेतकऱ्यांसाठी धाव; शेताच्या बांधावर जाऊन केले पंचनामे

शुद्ध सांडपाण्याचा वापर बंधनकारक होणार; राज्य सरकारचे धोरण जाहीर

बळीराजावरील अरिष्ट दूर कर! उपमुख्यमंत्री शिंदेंचे पांडुरंगाला साकडे; नांदेडचे रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर यांनाही महापूजेचा मान