ठाण्यात तीन ठिकाणी नवीन पादचारी पूल; वर्तकनगरची वाहतूककोंडी फुटणार प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

ठाण्यात तीन ठिकाणी नवीन पादचारी पूल; वर्तकनगरची वाहतूककोंडी फुटणार

ठाणे शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासह पादचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तीन ठिकाणी नवीन पादचारी पूल आणि स्कायवॉक उभारण्याची तयारी केली आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासह पादचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तीन ठिकाणी नवीन पादचारी पूल आणि स्कायवॉक उभारण्याची तयारी केली आहे. पोखरण रोड क्रमांक एकवरील वर्तकनगर नाक्यावर नवीन पूल बांधण्यात येणार असून, घोडबंदर रोडवरील मानपाडा आणि आर मॉल परिसरातील जुने पादचारी पूल हटवून त्या जागी नवीन पूल उभारले जाणार आहेत. या तिन्ही कामांचा संपूर्ण खर्च एमएमआरडीए करणार असून, यासाठी ठाणे महापालिकेच्या महासभेची मंजुरी घेतली जाणार आहे.

वर्तकनगर नाका परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. कॅडबरी सिग्नल ते उपवनकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. परिसरात अनेक शाळा असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका असतो. त्यामुळे येथे पादचारी सिग्नल बसविण्यात आला आहे. मात्र, या सिग्नलमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतूककोंडीत भर पडत आहे.

या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने २०१९-२० मध्ये तयार केला होता. २० जानेवारी २०२० रोजी महासभेने त्याला मंजुरीही दिली होती. मात्र, कोरोना काळातील आर्थिक परिस्थितीमुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. आता एमएमआरडीएमार्फत पूल उभारल्यानंतर पादचारी सिग्नल हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, घोडबंदर रोडवरील मानपाडा आणि आर मॉल अर्थात तत्त्वज्ञान विद्यापीठ परिसरातील पादचारी पूल २०१६-१७ मध्ये महापालिकेने बांधले होते. मात्र, सेवा रस्ते मुख्य रस्त्याला जोडण्याच्या कामामुळे या पुलांचे रॅम्प वाहतुकीच्या मार्गात येत आहेत. आर मॉलसमोरील पुलाचा रॅम्प ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या बाहेर पडणाऱ्या मार्गिकेत अडथळा ठरत आहे. तसेच मेट्रो स्थानकाच्या कामासाठी अवजड यंत्रसामग्रीची ने-आण करतानाही अडचणी निर्माण होत आहेत.

महासभेच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही

जुने पूल हटवून नवीन पूल अथवा स्कायवॉक उभारण्याचे नियोजन आहे. हे पूल मेट्रो स्थानकांशी जोडले जाणार असल्याने नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासह मेट्रो स्थानकात थेट प्रवेश करणे शक्य होणार आहे. एमएमआरडीएच्या अभियंत्यांसोबत तिन्ही ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या कामांना सहमती देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर एमएमआरडीए स्वखर्चाने ही कामे हाती घेणार आहे. त्यामुळे वर्तकनगर आणि घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी कमी होण्यासह पादचाऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्र कायम अव्वल राहणार; MIDC चे सीईओ दीपेंद्र कुशवाह यांचे प्रतिपादन; एआय, डेटा सेंटर आणि उत्पादनांच्या क्षेत्रात प्रचंड संधी

अंतराळातून परतलेल्या 'स्टारशिप'ला झेलले

मृत्युदंड रद्द करण्यास भारताचा विरोध; संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाविरोधात मतदान

जीसीसी क्षेत्रात महाराष्ट्राची आगेकूच! तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादला मागे टाकण्याची तयारी

Mumbai : कंपन्यांनी थकवला २३३ कोटी मालमत्ता कर; दहा ते १५ वर्षांपासून BMC ला वसुलीत अपयश