ठाणे : ठाणे शहरात लवकरच एक अभिनव आणि पर्यावरणपूरक उद्यान ठाणेकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. हिरानंदानी मेडोज परिसरात ठाणे महापालिकेकडून ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती करण्यात येत असून, हे उद्यान औषधी वनस्पती आणि नैसर्गिक हिरवाईने नटलेले असणार आहे. येत्या दिवाळीत या पार्कचे भव्य उद्घाटन होणार असून, हे उद्यान ठाणेकरांसाठी दिवाळीची विशेष भेट ठरणार आहे.
साडेतीन एकरांवर उभारण्यात येणाऱ्या या उद्यानात तब्बल १०५ औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. बांबू, तुळस, नीम, आवळा, अशोक यांसारख्या झाडांबरोबरच गुडमार, अडुळसा, हळद, सिट्रोनेला, गुळवेल, शतावरी, वाळा, केवडा, जांभूळ, पुदिना, हाडजोड, जायफळ, काळी मिरी, बेल, रुद्राक्ष यांसारख्या अनेक औषधी आणि सुगंधी वनस्पतींचा समावेश आहे. या उद्यानात प्रत्येक वनस्पतीजवळ QR कोड बसविण्यात येणार असून, त्या कोडवर क्लिक केल्यास संबंधित झाडाची संपूर्ण माहिती नागरिकांना मिळणार आहे. पर्यावरणपूरक उपक्रमाचा भाग म्हणून झाडांची लागवड हवामान शुद्ध ठेवण्यासाठी मदत करणार आहे.
हिरानंदानी मेडोज परिसरातील विद्यमान राजमाता जिजाऊ उद्यान नव्या स्वरूपात ‘राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क’ म्हणून विकसित करण्यात येत आहे. येथे शंभर वर्षांपेक्षा जुने झाड जतन करण्यात आले असून, आकर्षक वॉकिंग ट्रॅक, सावलीदार बसण्याची व्यवस्था आणि लहानसा तलाव तयार करण्यात येणार आहे. तलावात कमळासह विविध जलवनस्पतींची लागवड करण्यात येईल, ज्यामुळे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलणार आहे. तसेच उद्यानात सुंदर आमराईदेखील तयार करण्यात आली आहे.
५०० मीटर लांबीचा पथ
नागरिकांना सकाळ-संध्याकाळच्या वेळेत फेरफटका मारता यावा, यासाठी ५०० मीटर लांबीचा पथ तयार करण्यात आला आहे. त्या पथावर प्रत्येक ठिकाणी अंतर नमूद करण्यात आले असून, नागरिकांना किती अंतर चालले हे समजू शकेल. तसेच योगा आणि व्यायामासाठी स्वतंत्र जागा ठेवण्यात आली आहे.
पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून विद्युत दिवे कमी उंचीवर बसविण्यात आले असून, मार्गालगत बांबूंची लागवड करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांमुळे ठाणे शहराला एक नवे हरित फुफ्फुस मिळणार आहे. - मधुकर बोडके, उपायुक्त उद्यान विभाग ठाणे महापालिका