पावसाचा ठाणे-पालघर-रायगडला तडाखा! २४ तासांत सरासरी ८५.९ मिमी बरसला; पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत, प्रशासन अलर्ट मोडवर (Photo-X)
ठाणे

पावसाचा ठाणे-पालघर-रायगडला तडाखा! २४ तासांत सरासरी ८५.९ मिमी बरसला; पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत, प्रशासन अलर्ट मोडवर

ठाणे-पालघर-रायगडसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी आणि मुरबाड परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे.

Swapnil S

ठाणे-पालघर-रायगडसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी आणि मुरबाड परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सखल भाग जलमय, रस्ते आणि महामार्ग पाण्याखाली, तर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. दरम्यान, भिवंडीत पावसाशी संबंधित दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

भिवंडीत एकाचा मृत्यू, दोन दिवस रेड अलर्ट

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८.४० ते शनिवारी सकाळी ८.३० या २४ तासांच्या कालावधीत सरासरी ८५.९ मिमी पावसाची नोंद झाली असून भारतीय हवामान विभागाने शनिवार आणि रविवार या दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. भिवंडी बायपास येथे पाणी साचल्याने त्या पाण्यात बुडून एका इसमाचा तर, एका बैलाचा मृत्यू झाला.

ठाणे शहरात या २४ तासांत ७७.१८ मिमी पावसाची नोंद झाली असून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. खारीगाव परिसरात झाड कोसळून दुचाकीवरील दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी गजानन महाराज चौक, वंदना सिनेमागृह परिसर आणि जांभळी भाजी मार्केट परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

जिल्ह्यातील पावसाच्या नोंदी

जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाच्या नोंदीनुसार भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १५६.३ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल ठाणे तालुक्यात ९७.६ मिमी, कल्याण तालुक्यात ९०.६ मिमी, उल्हासनगर तालुक्यात ७४.० मिमी, शहापूरमध्ये ६५.८ मिमी, अंबरनाथमध्ये ५९.५ मिमी आणि मुरबाड तालुक्यात ५६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जलभरावाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त स्वतः मैदानात; कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अधिकाऱ्यांना कडक निर्देश

उल्हासनगर : सलग कोसळणारा पाऊस आणि शहरातील विविध भागांत निर्माण झालेल्या जलभरावाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी स्वतः मैदानात उतरून प्रमुख नाले, नदीपात्रे आणि जलवाहिन्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा देत त्यांनी नालासफाईची सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महानगरपालिका हद्दीतील मोठ्या व लहान नाल्यांच्या स्वच्छता आणि गाळ काढण्याच्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष स्थळभेट देऊन पाहणी केली. यावेळी सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी खन्ना कंपाऊंड ब्रिज परिसर, वालधुनी नदी, भरतनगर, कानसाई रोड, उल्हासनगर-५, मद्रासी पाडा येथील नाला तसेच जिजामाता कॉलनी येथील मोठ्या नाल्यांची पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.

नाल्यांमधील गाळ पूर्णपणे काढून तो तात्काळ उचलून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, तसेच नाल्यात कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा अडथळा राहू देऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्यात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरणे किंवा रस्त्यांवर जलभराव होणे टाळण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले. उल्हासनगरकरांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याची ग्वाही आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली.

मुसळधार पावसात मुख्य रस्ते जलमय; टिटवाळ्यात नैसर्गिक पाण्याचे मार्ग बंद

डोंबिवली/कल्याण : कल्याण-डोंबिवली शहर परिसरात शुक्रवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून वाहतूक, उद्योग आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी आणि औद्योगिक परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने काही कंपन्यांमध्ये पाणी घुसले असून उत्पादनावर परिणाम झाल्याने उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. फेज-२ मधील मालवण किनारा हॉटेल ते मेट्रोपॉलिटन एक्झोकेम कंपनीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तसेच वंदे मातरम् उद्यान, सर्व्हिस रोड, एम्स हॉस्पिटल मार्ग आणि चार बिल्डिंग परिसरात मोठ्या प्रमाणात जलभराव झाला आहे. दरम्यान, टिटवाळ्यातील मांडा परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बेकायदा चाळींच्या बांधकामासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे पाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. भूमाफियांनी नैसर्गिक जलप्रवाह अडवून बेकायदा बांधकामे केल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांचे मोठे हाल

मोहने, आंबिवली आणि शहाड परिसरातील सखल भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अंतर्गत रस्ते, चाळी, झोपडपट्टया आणि खाडीकिनारी वसलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्ता, ठाकुर्ली-चोळे ९० फुटी रस्ता आणि शिळ रस्ता जलमय झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहने संथ गतीने धावत असल्याने शहरात अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली आहे.

साडेतीन तासांत सुमारे ५० मिमी पाऊस; मोरबे धरणाची पाणीपातळी ७०.४८ मीटरवर, प्रशासन सतर्क

नवी मुंबई: भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शनिवारी शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मनपाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी ८.३० ते दुपारी १२ या अवघ्या साडेतीन तासांच्या कालावधीत शहरात सरासरी ४९.५० मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये कोपरखैरणे - विभागात सर्वाधिक ७४.२० - मिमी, ऐरोलीमध्ये ६८.६० मिमी, दिघ्यात ४७.१० मिमी, वाशीमध्ये ४१.२० मिमी, बेलापूरमध्ये ३८.४० मिमी, तर नेरूळमध्ये २७.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

महापालिकेचे आवाहन

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर पूर्ण क्षमतेने कार्यरत असून शहरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी महापालिकेच्या १८००२२२३०९ किंवा १८००२२२३१० या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिकेने केले.

कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग जलमय

मुरबाड : पहिल्याच मुसळधार पावसात कल्याण-मुरबाड रस्त्यावरील कांबा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे १,१०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करून उभारण्यात आलेल्या या राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात जलभरावाची समस्या उद्भवत असतानाही संबंधित यंत्रणांनी त्यातून कोणताही धडा घेतलेला नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

मुरबाड शहरातील प्रमुख नाल्यांचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती. शहरातील प्रमुख पुलाला तसेच त्याच्या संरक्षण भिंतींना भेगा पडल्याचेही निदर्शनास आले असून त्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, कल्याण मुरबाड-माळशेज घाट मार्गालगतची अनेक मोठी झाडे कोसळण्याच्या स्थितीत असून घाट परिसरात दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अर्धा काँक्रीट आणि अर्धा डांबरी असा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करत नागरिकांनी संबंधित यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली आहे. सतत पाऊस सुरू राहिल्यास या मार्गावरील जलभराव आणि भूस्खलनाचा धोका वाढून वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वसई-विरार शहरात पाणीच पाणी चोहीकडे पूरस्थिती; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, प्रशासकीय यंत्रणा सतर्क

वसई : वसई-विरार शहरात सलग पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

महामार्गावरील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वसई पूर्वेतील पांढतारा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत.

वसई पूर्वेतून वाहणाऱ्या तानसा आणि वैतरणा नद्या दुथडी भरून वाहत असून यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्याचा फटका शहरालाही बसत आहे.उरण : शनिवारी सकाळपासून

उरण शहर व तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. तालुक्यातील चिरनेर, नागाव या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून कातळपाडा, मुळपाडा, रांजणपाडा आणि मधिलपाडा येथील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. नैसर्गिक पाण्याचे मार्ग बुजवून विविध ठिकाणी भराव केल्यामुळे दरवर्षी ही पूरस्थिती उद्भवत असल्याचा आरोप नागरिकांनी

केला आहे. अनेक भागात झाडे उन्मळून पडली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठी गटारे असली तरी मुसळधार पाऊस आणि वैतरणा खाडीतील वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेचे आयुक्त, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि सर्व नगरसेवक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच असे शहरात कुठेही पाणी साचल्यास किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. -
अजीव पाटील, महापौर

वसई-नालासोपारा दरम्यान रेल्वे रूळ पाण्याखाली

वसई : सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यानची पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील लोकल गाड्या सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून गाड्या संथ गतीने चालविण्यात येत असल्याने संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. लोकल सेवा उशिराने धावत असल्याने कामावर जाणाऱ्या हजारो प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागत असून, वसई, नालासोपारा आणि विरार स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

पुराच्या विळख्यातून नागरिकांची सुटका

वसई पूर्वेकडील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या सकवार भागात वेगाने पाणी साचल्यामुळे विरार येथील १३ नागरिक पुरात अडकले होते. वाढत्या पाणी पातळीमुळे अडकलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जवानांनी कसलीही वाट न पाहता बोटीच्या सहाय्याने तातडीने मदतकार्य सुरू केले. पुरात अडकलेल्या सर्व १३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती तहसील विभागाने दिली आहे.

टोल-फ्री क्रमांक उपलब्ध

महानगरपालिकेने १८००२३३४३५३ आणि १८००२६७३८९८ हे टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ०२५०-२३३४५४६, ०२५०-२३३४५४७, ८६६९९७६१०१ आणि ७०५८९११९२५ या दूरध्वनी क्रमांकांवरही नागरिकांना संपर्क साधता येणार आहे. याशिवाय महानगरपालिका भवनातील ०२५०-६६३०००० तसेच ०२५०-२५२५१०१ ते ०२५०-२५२५१०६ या क्रमांकांवरही आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

पेण रायगड जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले असून यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शनिवारी जिल्ह्यात सरासरी १११.२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून चालू हंगामातील एकूण पर्जन्यमान ९६.६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २८ लघुप्रकल्पांपैकी ५ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून एकूण धरणसाठा ५३.६८ टक्क्यांवर गेला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. रोहा तालुक्यातील अंबा नदी ८.९५ मीटर, कुंडलिका नदी २३.१० मीटर आणि पाताळगंगा नदी २०.६० मीटर पातळीवर वाहत असल्याने प्रशासनाकडून दर चार तासांनी पाणीपातळीचा आढावा घेतला जात आहे.

चिरनेर गावात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत

उरण : शनिवारी सकाळपासून उरण शहर व तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. तालुक्यातील चिरनेर, नागाव या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून कातळपाडा, मुळपाडा, रांजणपाडा आणि मधिलपाडा येथील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. नैसर्गिक पाण्याचे मार्ग बुजवून विविध ठिकाणी भराव केल्यामुळे दरवर्षी ही पूरस्थिती उद्भवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक भागात झाडे उन्मळून पडली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

चार कोटी रुपये खर्च करूनही शहर जलमय

मीरा-भाईदर : पहिल्याच जोरदार पावसाने मीरा-भाईंदर शहराला झोडपून काढले असून संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

सखल भागातील शेकडो नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून वाहनेही पाण्यात तरंगताना दिसली. जमिनीखालील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये दूषित पाणी मिसळल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप नाल्यांच्या व्यक्त होत आहे. सुमारे २०० लहान-मोठ्या सफाईसाठी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपने तब्बल चार कोटी रुपयांचा खर्च केला होता, तसेच नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावाही केला होता. मात्र पहिल्याच पावसाने या दाव्याची पोलखोल केली आहे.

दुसरीकडे घोडबंदर मार्गावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगररांगांमधून आलेले पाणी वरसावे नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर साचल्याने वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती.

पालघरमध्ये रेल्वे व रस्ते वाहतूक विस्कळीत

पालघर : जिल्ह्यात दिवसभरात सरासरी ९८ मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीच्या १२२ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेलाही फटका बसला आहे. समर्पित मालवाहतूक मार्गिकेवरून पश्चिम रेल्वेच्या मार्गावर येणाऱ्या एका मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. याशिवाय पालघर रेल्वे स्थानक आणि यार्ड परिसरात पावसाचे पाणी साचल्याने दुपारच्या सुमारास लोकल गाड्या संथ गतीने धावत होत्या. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पालघर तालुक्यात सर्वाधिक १३४ मिमी, वसई तालुक्यात १२३ मिमी, वाडा तालुक्यात १०९ मिमी आणि डहाणू तालुक्यात ७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

माथेरानमध्ये आता पार्किंगचे नो टेन्शन; दस्तुरी नाका येथे २२ हजार चौ. मी. भूखंडावर वाहनतळ, पर्यटकांना मोठा दिलासा

पावसाचे धूमशान! ठाणे-पालघर पट्ट्यात मुसळधार; मुंबईत आजही रेड अलर्ट, रेल्वे उशिराने, उपनगरातील रस्ते पाण्याखाली

झाडांच्या मुळांभोवतीचे काँक्रीटीकरण संपूर्ण मुंबईतून हटवा; वकिलाची BMC ला कायदेशीर नोटीस

कांदा खरेदी दरात प्रतिक्विंटल २५० रुपयांची वाढ; शेतकऱ्यांना अंशतः दिलासा, नवा दर २१२५

मुंबईत देशातील पहिला पादचारी प्रकल्प; महापालिका करणार आराखडा, सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर