ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची मंगळवारी (दि. २९) रात्री सुमारे ९.३० वाजता मानपाडा परिसरातील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, आणखी काही जणांचा शोध सुरू आहे. दरम्यान, हत्येच्या काही दिवस आधीच वडिलांविरोधात कट रचला जात असल्याचा संशय आल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले असून, कुटुंबीयांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रदीप पूर्णेकर हे त्यांच्या कार्यालयात असताना हेल्मेट घातलेले दोन हल्लेखोर दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी कार्यालयात घुसून पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला. एकूण चार राऊंड फायर करण्यात आले असून त्यापैकी दोन गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानेही हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून त्याआधारे पोलिसांचा तपास सुरू आहे.
दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
माध्यमांच्या वृत्तानुसार, तपासात निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीसह पाच संशयितांची नावे समोर आली आहेत. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
'कट रचला जात असल्याचा संशय'
प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर याने हत्येपूर्वीच वडिलांना संभाव्य धोक्याची माहिती दिल्याचा दावा केला आहे. रामच्या म्हणण्यानुसार, हत्येच्या काही दिवस आधी त्याने राजेंद्र शिंदे आणि नंतर संशयित म्हणून समोर आलेल्या काही व्यक्तींना परिसरात एकत्र पाहिले होते. रामला पाहिल्यानंतर संबंधित व्यक्ती दचकल्या, असा त्याचा दावा आहे.
यानंतर एका अनोळखी व्यक्तीने रामजवळ येऊन तो प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा आहे का, अशी विचारणा केली होती, असेही त्याने सांगितले. ही माहिती त्याने वडिलांना दिली होती. काहीतरी नियोजन सुरू असल्याचा संशय व्यक्त करत त्याने राजेंद्र शिंदे यांच्या नावाचाही उल्लेख केला होता, असा रामचा दावा आहे.
यानंतर प्रदीप पूर्णेकर यांनी रामला रात्री १० वाजल्यानंतर घराबाहेर पडू नकोस, असे सांगितले होते. 'माझ्यासाठी असलेली गोळी तुला लागू शकते', असा इशारा वडिलांनी दिल्याचे रामने माध्यमांशी बोलताना सांगितले.
मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कुटुंबीयांचे आरोप
या कथित कटामागे ठाण्याच्या माजी महापौर आणि शिवसेना (शिंदे) गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे तसेच त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. मीनाक्षी शिंदे यांच्या एका कथित ऑडिओ क्लिपचा दाखलाही रामने दिला आहे. मात्र, या आरोपांची पोलिसांकडून अद्याप पडताळणी झालेली नाही आणि हत्येमागील नेमके कारणही तपासातून स्पष्ट झालेले नाही.
रामने ताब्यात घेतलेल्या पप्या शिंदे याच्याबाबतही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पप्या शिंदे हा वडिलांचा जुना परिचित असल्याचे आणि तो हल्ल्याच्या दोन दिवस आधी पूर्णेकर यांच्या कार्यालयात बराच वेळ बसला होता, असे रामने सांगितले. या दाव्यांचीही तपास यंत्रणेकडून पडताळणी सुरू आहे.
सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका
या घटनेनंतर पूर्णेकर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून, सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आला होता. उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
पूर्णेकरांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही - संजय राऊत
या हत्येनंतर ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत राजकीय संघर्षाचा संदर्भ दिला आहे.
ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली, गृह खात्याचे हे धिंडवडे आहेत. प्रदीप पूर्णेकरांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही! लढवय्या शिवसैनिकाला दुःखद अंतःकरणाने श्रद्धांजली! असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, हत्येचे कारण आणि त्यामागील व्यक्तींची भूमिका याबाबत अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.