ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार यांना मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने पप्या शिंदे याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर निखिल यादव आणि नितेश पवार यांच्या पोलीस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ केली. दरम्यान याच अनुषंगाने शिंदे सेनेच्या माजी महापौर तथा नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची चौकशी करण्यात आली.
दरम्यान, आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. आरोपींची एकत्रित चौकशी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राबाबत माहिती मिळवणे, तसेच हत्येच्या कटात प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास करण्यासाठी यादव आणि पवार यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली होती. दरम्यान, मयत पूर्णेकर यांच्या मुलाने आणि भावाने काही व्यक्तींबाबत संशय व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत. याच अनुषंगाने शिंदे सेनेच्या माजी महापौर तथा नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना मंगळवारी ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात बोलावून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
पूर्णेकर हत्या प्रकरणात संबंधित व्यक्तींची भूमिका काय आहे? याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. या चौकशीतून कोणती माहिती समोर येते आणि तपासाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.