Thane : रिंग मेट्रोचा आराखडा बदलणार; प्रताप सरनाईकांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश संग्रहित फोटो
ठाणे

Thane : रिंग मेट्रोचा आराखडा बदलणार; प्रताप सरनाईकांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पात कमीत कमी नागरिकांचे विस्थापन होईल आणि जास्तीत जास्त ठाणेकरांना मेट्रोचा लाभ मिळेल, या उद्देशाने प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो प्राधिकरणाला दिले आहेत.

Swapnil S

ठाणे : ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पात कमीत कमी नागरिकांचे विस्थापन होईल आणि जास्तीत जास्त ठाणेकरांना मेट्रोचा लाभ मिळेल, या उद्देशाने प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो प्राधिकरणाला दिले आहेत. परिवहन मंत्री तथा ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बैठकीत मांडलेल्या सूचनांची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला असून, त्याबद्दल सरनाईक यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या, वाढणारी वाहतूक आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रिंग मेट्रो प्रकल्पाला महत्त्व दिले जात आहे. बैठकीत मेट्रो प्राधिकरणाने सादर केलेल्या मूळ आराखड्यावर प्रताप सरनाईक यांनी आक्षेप नोंदवत पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मांडला.

सरनाईक यांनी मांडलेल्या सर्व सूचनांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेत, लोकहिताला प्राधान्य देत सुधारित आराखडा तयार करण्याचे स्पष्ट निर्देश मेट्रो प्राधिकरणाला दिले. या निर्णयामुळे लोकमान्यनगरसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

ठाणे रिंग मेट्रो हा सर्वसामान्यांच्या हिताचा प्रकल्प ठरला पाहिजे. विकास करताना कमीत कमी विस्थापन आणि जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा, हीच आमची भूमिका आहे. माझ्या सूचनांची दखल घेऊन सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

उपवन आर्ट फेस्टिव्हलवरही विपरीत परिणाम

वागळे इस्टेट ते लोकमान्यनगर बस डेपोमार्गे उपवन परिसरापर्यंतच्या प्रस्तावित मार्गामुळे लोकमान्यनगरमधील सुमारे १,५०० कुटुंबे बाधित होण्याची शक्यता आहे. तसेच उपवन परिसरातील काही औद्योगिक क्षेत्रांवर परिणाम होण्याबरोबरच ठाण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या उपवन आर्ट फेस्टिव्हलवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय वीर सावरकर नगर, महात्मा फुले नगर, रुणवाल प्लाझा परिसर, लोकमान्यनगर, वेदांत कॉम्प्लेक्स, दोस्ती कॉम्प्लेक्स, समतानगर, लक्ष्मीनगर-चिरागनगर, वर्तकनगर-भीमनगर तसेच शास्त्रीनगर आणि शिवाईनगरमधील सुमारे एक लाख नागरिकांना प्रस्तावित मार्गाचा थेट लाभ मिळणार नसल्याचेही त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.

असा असेल पर्यायी मार्ग

वागळे इस्टेट-लोकमान्यनगर बस डेपो-आई माता मंदिर-रुणवाल प्लाझा- वेदांत-आचार्य अत्रे मार्ग-वर्तकनगर-पोखरण रोड क्रमांक १-देवदया पार्क- पोखरण रोड क्रमांक २ असा पर्यायी मार्ग सुचविला. या मार्गामुळे विस्थापन कमी होईल, अधिक नागरिकांना मेट्रो सेवा उपलब्ध होईल आणि प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यताही वाढेल, असा दावा त्यांनी केला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)'

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी