ठाणे

ठाणे : पालिकेच्या डीपी प्लॅनच्या भीतीने राहत्या घरांची विक्री; हक्काचा निवारा गमावण्याच्या भीतीने नागरिकांचा निर्णय

ठाणे महापालिकेचा नवीन विकास आराखडा हा खारेगावला उदध्वस्त करणारा असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याचबरोबर खारेगावमध्ये टाकण्यात आलेल्या रस्त्याच्या आरक्षणाला स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांनी आपला विरोध दर्शवला आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिकेचा नवीन विकास आराखडा हा खारेगावला उदध्वस्त करणारा असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याचबरोबर खारेगावमध्ये टाकण्यात आलेल्या रस्त्याच्या आरक्षणाला स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांनी आपला विरोध दर्शवला आहे. मात्र वारंवार पत्रव्यवहार करूनही याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्यामुळे हक्काचा निवारा गमवावा लागू नये, यासाठी आपली राहती घरे विकण्याचा निर्णय काही नागरिकांनी घेतला आहे.

ठाण्याचा नवीन विकास आराखडा काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला असून हा विकास आराखडाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या विकास आराखड्यात खारेगावमध्ये डीपी रस्त्याचे आरक्षण टाकण्यात आले असून यामध्ये स्वतंत्र सैनिकांची आणि भूमिपुत्रांची घरे उदध्वस्त होणार आहेत.

हा रस्ता संपूर्ण खारेगावच उदध्वस्त करणार असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीच केला आहे. नवीन विकास आराखड्याच्या माध्यमातून अख्खे ठाणे खायचा विचार करणारे बिल्डर त्यांनी हा डीपी प्लॅन तयार केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि मंत्रालयात बसलेले अधिकारी बसून डीपी प्लॅन बसवतात. हा डीपी प्लॅन कुठे बनवला कसा बनवला याच्या कहाण्या भलत्याच आहेत. मी या डीपी प्लानमध्ये एवढी जागा सोडून देतो, म्हणून स्क्वेर फुटामागे पैसे घेतले जातात, असा आरोपही आव्हाड यांनी केला होता.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ज्येष्ठ नेते दशरथ पाटील आणि स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी देखील या मुद्यावर पत्रकार परिषद घेऊन या नवीन आराखड्यातील आरक्षणाला विरोध असल्याची भूमिका घेतली होती. अनेकांची घरे यामुळे उदध्वस्त होणार असल्याची भीती नागरिकांच्या मनात असल्याने आता याच धास्तीने काही नागरिकांनी आपली राहती घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणामध्ये घर गेल्यास पुन्हा घर मिळेल की नाही? याची शाश्वती नसल्याने काही नागरिकांनी असा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. येत्या सात ते आठ महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात विकास आराखड्याचा मुद्दा भविष्यात अधिक तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Women’s World Cup : महिला विश्वचषक फायनलची उत्सुकता प्रतीक्षेत बदलली; पावसाचा जोर कायम, चाहत्यांची नाराजी

Pune Accident : कोरेगाव पार्क परिसरात भीषण दुर्घटना; भरधाव कारची मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक, गाडीचे झाले तुकडे, २ भावांचा जागीच मृत्यू |Video

Women’s World Cup : ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य; भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

जयपूर हादरले! सहावीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; शाळेतल्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन, CCTV कॅमेऱ्यात थरारक घटना कैद

Women’s World Cup : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! महिला विश्वचषक फायनलसाठी हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द